रिलायन्सचे अधिकारी, अनिल अंबानी आरोपी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. जीवन विमा महामंडळाच्या तक्रारीनुसार, खोट्या कागदपत्रांच्या आधारे ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून ३,७५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कंपनीची आर्थिक स्थिती आणि कर्जाबाबत चुकीची माहिती देण्यात आली.

anil ambani and reliance officials caught in fraud web accusation of rs 3750 crore scam

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी आणखी एक गुन्हा दाखल केला. जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) वतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे रिलायन्सने गुंतवणूक करण्यास भाग पाडून ३,७५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिलायन्सचे अनिल अंबानी आणि इतर अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करण्यात आले आहे. रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीची आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, विविध बँका आणि वित्त संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची हमी याबाबत चुकीची माहिती देत ‘नॉन कन्व्हर्टेबल डीबेंचर’च्या (एनसीडी) स्वरूपात तब्बल ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतली.