गिलच्या नेतृत्वावरचकुंबळे यांचा प्रश्न

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारतीय कर्णधार शुभमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. टी-२० विश्वचषक संघातून वगळल्यानंतर आता त्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात गिलच्या नेतृत्वातील चुकांवर बोट ठेवले. प्रसिध कृष्णासारख्या प्रमुख गोलंदाजाला उशिरा गोलंदाजी दिल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

anil kumbles strong question on shubman gills leadership

न्यू चंडीगड : भारतीय कसोटी आणि वन-डे क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल अद्याप दुष्टचक्रातून बाहेर आलेला नाही. हरपलेला सूर, टी-२० वर्ल्ड कप संघातून झालेली गच्छंती अन् आता त्याच्या नेतृत्वगुणांवरही टीका होऊ लागली आहे. बुधवारी भारताचे माजी प्रशिक्षक आणि फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी गिलच्या नेतृत्वातील चुकांवर बोट ठेवले. याला निमित्त ठरला तो मंगळवारचा गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा आयपीएल टी-२० सामना.

मुल्लानपूर येथे झालेल्या या सामन्यात गिल याच्या ‘गुजरात’ संघाला ‘पंजाब’कडून तीन विकेटनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात प्रसिध कृष्णा याच्यासारख्या प्रमुख गोलंदाजास त्याने डावात खूप नंतर गोलंदाजी दिली. ज्यावर कुंबळे यांच्यासह सामान्य क्रिकेटप्रेमींनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘गेल्या आयपीएल मोसमात ज्याने सर्वाधिक विकेट टिपून मानाची ‘पर्पल कॅप’ पटकावली, त्या प्रसिध कृष्णाला गुजरात टायटन्सने १३व्या षटकांत गोलंदाजीस आणले. हे अत्यंत आश्चर्यकारक होते,’ याकडे कुंबळे यांनी लक्ष वेधले.