भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या क्रांती चौक येथील कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक बाबुराव कदम, समितीचे अध्यक्ष नवीन सिंग ओबेराय, पृथ्वीराज पवार, ख्वाजा शरफोद्दीन, किशोर थोरात, बाळकृष्ण इंगळे, दादाराव राऊत, अरविंद अवचरमल, दिलीप पाडमुख, मंजुषा पवार, विकास जैन, सुमित खांबेकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पालकमंत्री शिरसाट म्हणाले, ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपण घडलो. मोठे झाले. त्यांची जयंती जल्लोषात साजरी झालीच पाहिजे. छत्रपती संभाजीनगर हे चळवळीचे केंद्र आहे. या चळवळीतून अनेक पुढारी तयार झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संभाजीनगरला कर्मभूमी मानले. नागसेन वनात शैक्षणिक संस्था उभारून मराठवाड्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करून दिली. या महाविद्यालयातून शिकलेले विद्यार्थी मंत्रालयात मोठ्या पदावर अधिकारी झाल्याचे आपण पाहतो.’
दरम्यान, आमदार प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी उत्सव समितीच्या कार्यालयास भेट दिली. या वेळी शिवाजीराव कवडे, लक्ष्मण हिवराळे, इब्राहिम पठाण, विश्वनाथ दांडगे, विजय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

