छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक विभागाने शंभर दिवसांचा आराखडा तयार करावा, असे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना दिले. तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी सुरू केलेल्या योजना व प्रकल्प यापुढेही सुरूच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. उत्पन्न वाढीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि राबवण्यात येणारी मोहीम या बद्दल शंभर दिवसांचा आराखडा तयार करून, तो सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. उत्पन्नवाढीवर भर देण्यासाठी काटकसरीचे धोरण अवलंबण्यात यावे, आवश्यक असेल तिथेच खर्च करावा. लेखा विभागाने नियोजन करून खर्चावर मर्यादा आणावी, असे निर्देश देखील येडगे यांनी दिले.
पाणीपुरवठा योजनेसाठी ८२२ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. कर्ज परतफेडीसाठी नियोजन करावे लागेल, असे ते म्हणाले.

