मिरवणुकांसाठी नियोजन

महाराष्ट्र टाइम्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीसाठी महापौर समीर राजूरकर यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सोईसुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. मार्गावरील खड्डे बुजवणे, पथदिवे सुरू ठेवणे, स्वच्छता राखणे यावर भर देण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट, विद्युत रोषणाई, म्युझिक सिस्टीम आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. भडकल गेट येथे वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली जाईल.

municipal planning for dr babasaheb ambedkar jayanti procession

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्याने १४ एप्रिल रोजी शहरातून मिरवणूक काढण्यात येते. मिरवणूक मार्गावर आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन द्या असे आदेश महापौर समीर राजूरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीसाठी महापालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय कोंबडे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, मोहिनी गायकवाड, विजय मोरे आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना निर्देश देताना महापौर म्हणाले, मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत. ढापे उघडे असतील ते बंद करण्यात यावेत.

पथदिवे सुरु राहतील याची खबरदारी घ्यावी. मिरवणूकीच्या मार्गावर स्वच्छता ठेवावी. मिरवणूक मार्गाची महापालिका, पोलीस प्रशासन, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी व मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट याची व्यवस्था करावी. भडकल गेट येथे स्टेज आणि पुतळ्याची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. विद्युत रोषनाई, म्युझिक सिस्टीम, सुशोभीकरण महापालिकेने करावे असे ते म्हणाले.

मिरवणूकीच्या स्वागतासाठी उभारण्यात येणारे स्टेज दिलेल्या परवानगीनुसारच बांधलेले आहेत का याची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. नियोजित जागेपेक्षा अधिक जागा व्यापल्यास मिरवणूकीस अडथळा निर्माण होऊ शकतो असे उपमहापौर राजेंद्र जंजाळ म्हणाले. भडकल गेट येथे वैद्यकीय पथक व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची सूचना सभापती अनिल मकरिये यांनी केली.