पाक-तालिबानची चीनमध्ये चर्चा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चीनमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी चीन मध्यस्थी करत आहे. उरुमकी येथे ही बैठक सुरू आहे. पाकिस्तानने केलेल्या कारवाईनंतर ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा आहे. व्यापार मार्ग पुन्हा सुरू करण्यासारख्या उपायांवर चीन भर देत आहे. अफगाणिस्तानने चीनकडे मदत मागितली होती.

china mediates pakistan taliban discussions

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमध्ये चीनमध्ये पुन्हा एकदा चर्चेची फेरी सुरू झाली आहे. महिनाभरापासून सुरू असलेला संघर्ष थांबवून दोन्ही देशांत दीर्घकालीन शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी चीन मध्यस्थी करीत असल्याची माहिती पाकिस्तानच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

चीनमधील उत्तर भागातील उरुमकी येथे दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. सद्यस्थितीतील युद्ध थांबवणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानने २६ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानातील कथित दहशतवादी तळांविरुद्ध ‘ऑपरेशन गझब लिल-हक’ सुरू केल्यानंतर दोन्ही शेजारी देशांमधील ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक केवळ मध्यस्थीसाठी नसून, दोन्ही देशांमधील तणावावर एकमेकांचे दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी आहे. यातून लगेच कोणताही मोठा निकाल हाती येण्याची शक्यता कमी असली, तरी व्यापार मार्ग पुन्हा सुरू करण्यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांवर चीन भर देत आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी चीनकडे मदत मागितली होती. त्यानंतर चीनने पाकिस्तानचे उपपंतप्रधान इसहाक डार डार यांना याबाबत विनंती केली होती.

तेरा दहशतवादी ठार

पेशावर : पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये १३ दहशतवाद्यांना ठार केले.