रिझवी-स्टब्समुळे विजय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर सहा विकेट्सने मात केली. समीर रिझवीने नाबाद ७० धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्सने नाबाद ३९ धावा केल्या. लखनौने दिलेल्या १४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातीला ४ बाद २६ अशी अवस्था होती. रिझवी आणि स्टब्सच्या भागीदारीने दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्लीच्या गोलंदाजांनी लखनौचा डाव १४१ धावांत गुंडाळला.

delhi capitals spectacular victory thanks to rizvi stubbs outstanding performance

गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर समीर रिझवीचे आक्रमक अर्धशतक आणि त्याला ट्रिस्टन स्टब्सने दिलेली संयमी साथ या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघावर सहा विकेट आणि १७ चेंडू राखून मात केली.

एकाना स्टेडियमवर बुधवारी ही लढत झाली. ‘लखनौ’ने दिलेल्या १४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल, पथूम निसंका, नितीश राणा, अक्षर पटेल झटपट माघारी परतले होते. त्या वेळी ‘दिल्ली’ची ४.३ षटकांत ४ बाद २६ अशी अवस्था होती. राहुल आणि अक्षरला खातेही उघडता आले नाही. यातून रिझवी आणि स्टब्सने ‘दिल्ली’ला बाहेर काढले. या जोडीने ७६ चेंडूंत ११९ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि ‘दिल्ली’ला १७.१ षटकांतच विजय मिळवून दिला. ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आलेल्या रिझवीने ४७ चेंडूंत पाच चौकार व चार षटकारांसह नाबाद ७०, तर स्टब्सने ३२ चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह नाबाद ३९ धावा केल्या.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय घेतला. त्याचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. लखनौचा डाव १८.४ षटकांत अवघ्या १४१ धावांत गुंडाळला. खेळपट्टी फलंदाजीसाठी फारशी सोपी नसली, तरी ‘लखनौ’च्या फलंदाजांनी ज्या प्रकारे विकेट्स गमावल्या त्याला कोणतेही सबळ कारण नव्हते. मिचेल मार्श, ऋषभ पंत अशी सलामीची जोडी, तिसऱ्या क्रमांकावर एडन मार्करमसारखा खंदा फलंदाज, निकोलस पूरन याच्यासारखा टी-२० क्रिकेटला साजेसा शिलेदार अशी तारांकितांची फळी असतानाही ‘लखनौ’चा डाव कोसळला.

दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच लखनौ संघावर वर्चस्व गाजवले. पंत दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. एडन मार्करम ११ धावांवर बाद झाला, तर आयुष बदोनीला भोपळाही फोडता आला नाही. मार्शने २८ चेंडूंत तीन षटकार व दोन चौकारांसह सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. एन्गिडीने आपल्या संथ चेंडूंच्या जोरावर ‘लखनौ’च्या फलंदाजांची मोठी कोंडी केली आणि शाहबाज अहमदलाही एका अचूक यॉर्करवर बाद केले. दुसरीकडे, कुलदीप यादवने धोकादायक मिचेल मार्शला आपल्या गुगलीवर चकवून बाद केले. ‘लखनौ’चा संघ कागदावर जेवढा मजबूत वाटत होता, मात्र मैदानात त्यांची कामगिरी तशीच झाली नाही. ‘लखनौ’च्या डावात पाच षटकार व ११ चौकारांचाच समावेश होता.

संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपर जायंट्स - १८.४ षटकांत सर्व बाद १४१ (मिचेल मार्श ३५, ऋषभ पंत ७, एडन मार्करम ११, आयुष बदोनी ०, निकोलस पूरन ८, अब्दुल समद ३६, मुकुल चौधरी १४, शाहबाझ अहमद नाबाद १५, महंमद शमी १, ॲनरिक नॉर्किया ०, मोहसीन खान ०, मुकेशकुमार ३-०-१७-०, ल्युंगी एन्गिडी ३.४-०-२७-३, अक्षर पटेल ३-०-१७-१, टी. नटराजन ४-०-२९-३, कुलदीप यादव ४-०-३१-२) पराभूत वि. दिल्ली कॅपिटल्स - १७.१ षटकांत ४ बाद १४५ (के. एल. राहुल ०, पथूम निसंका १, नितीश राणा १५, समीर रिझवी नाबाद ७०, अक्षर पटेल ०, ट्रिस्टन स्टब्स नाबाद ३९, महंमद शमी ४-०-२८-१, प्रिन्स यादव ३-०-२०-२, मोहसीन खान ४-०-१९-१).