वर्ल्ड कप विजेत्या भारताच्या दिव्या देशमुखला कँडिडेट्स बुद्धिबळातील महिलांच्या स्पर्धेतील चौथ्या फेरीत चीनच्या झू जिनेरविरुद्ध पांढऱ्या मोहरा असतानाही हार पत्करावी लागली. यामुळे तिची स्पर्धेत मोठी पीछेहाट झाली. सायप्रसला सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी आर. प्रज्ञानंद आणि आर. वैशाली यांच्या लढती बरोबरीत सुटल्या.
दिव्याला मंगळवारी झालेल्या तिसऱ्या फेरीत मॅरेथॉन लढतीनंतर बरोबरी पत्करावी लागली होती. त्या लढतीत तिने थोडक्यात हार टाळली होती. या वेळी मात्र तिला अखेरच्या दहा चाली काही सेकंदांत करण्याचे आव्हान पेलवले नाही आणि ३६ चालींतच तिने लढत गमावली.
वैशालीला पांढऱ्या मोहरा असल्याचा पूर्ण फायदा घेता आला नाही आणि तिने अलेक्झांड्रा गॉर्याचकिना हिच्याविरुद्ध २७ चालींनंतर गुण वाटून घेण्याचे ठरवले. तिसऱ्या फेरीतून सावरताना प्रज्ञानंदने मथायस ब्ल्यूबाऊम याच्याविरुद्धच्या डावात ३७व्या चालीच्या वेळी गुण वाटून घेण्याचे ठरवले.

