मुंबई : भारतीय संघ जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय पुरुष संघ २३, २५ आणि २६ जुलै रोजी यजमान झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध २६ आणि २८ जून रोजी दोन टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
नेमबाजांची निराशा
तांजियर (मोरोक्को) : पहिल्या शॉटगन वर्ल्ड कप स्पर्धेत दोन दिवसांच्या पात्रता फेरीनंतर पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत भारतीय ट्रॅप नेमबाजांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.
गुरव यांचे निधन
मुंबई : मुंबईतील क्रिकेट मैदान गाजवलेले अनिल गुरव (वय ५९) यांचे मंगळवारी नालासोपारा येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचे मार्गदर्शन लाभलेले गुरव यांच्या फटकेबाजीचे सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण अमरे हे चाहते होते. त्यांना मुंबईतील क्रिकेट मैदानावर ‘व्हिव्ह रिचर्ड्स’ असे संबोधले जात होते. सचिनने शालेय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा शतक केल्यावर त्याला गुरव यांनी आपली बॅट भेट म्हणून दिली होती.

