होर्मुझ उघडू, पण तुमच्यासाठी नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इराणने अमेरिकेला होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इशारा दिला आहे. इराणच्या नियमांचे पालन करणाऱ्यांसाठी ही सामुद्रधुनी खुली राहील, पण अमेरिकेसाठी नाही. बांगलादेशच्या सहा जहाजांना इराणने सुरक्षित मार्ग दिला आहे. दरम्यान, अमेरिकेने पश्चिम आशियात अतिरिक्त सैन्य पाठवले आहे. इस्रायलने इराणच्या कुद्स फोर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ठार मारले आहे.

होर्मुझ उघडू, पण तुमच्यासाठी नाही

‘आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली करू, पण तुमच्यासाठी नाही,’ असा इशारा इराणने अमेरिकेला बुधवारी दिला. ‘अमेरिकेचे सत्ताबदलाचे स्वप्न साकार झाले आहे; पण या सागरी प्रदेशातील सत्तेबाबत,’ असा खोचक टोलाही इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहीम अझिझी यांनी दिला.

‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ताबदलाचे स्वप्न साकार केले आहे, पण या प्रदेशातील समुद्रांच्या व्यवस्थेत. होर्मुझची सामुद्रधुनी निश्चितच उघडली जाईल; पण तुमच्यासाठी नाही! इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या नवीन नियमांचे पालन करणाऱ्यांसाठी. पाहुणचाराचा ४७ वर्षांचा काळ संपला आहे’, असे अझिझी म्हणाले.

बांगलादेशच्या सहा जहाजांना सवलत

ढाका : होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी थांबलेल्या बांगलादेशच्या इंधनवाहू सहा जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यास इराणच्या सुरक्षा परिषदेने मान्यता दिल्याचे इराणने सांगितले. इंधनाच्या बाबतीत आयातीवर अवलंबून असलेल्या बांगलादेशमध्ये पेट्रोलियम साठा सातत्याने कमी होत असताना, कतारहून पाच एलएनजी मालवाहू जहाजे आणि सौदी अरेबियाहून एक कच्च्या तेलाचे जहाज, ज्यांमध्ये जवळपास पाच लाख टन एलएनजी आणि सुमारे ७९ हजार टन कच्चे तेल घेऊन थांबले आहे. ‘बांगलादेशी नागरिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, अशी इराणची इच्छा आहे आणि होर्मुझमधून इंधन वाहतुकीसाठी सर्व आवश्यक साह्य पुरवले जाईल,’ असे इराणचे ढाका येथील राजदूत जलील रहिमी जहानाबादी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. बांगलादेशने या सामुद्रधुनीतून जहाजांना मार्ग देण्याची विनंती इराणला केली होती.

अमेरिकेकडून अतिरिक्त कुमक

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प एकीकडे युद्धविरामाबाबत बोलत असताना अमेरिकेने पश्चिम आशियात अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. विमानवाहू युद्धनौका यूएसएस जॉर्ज ड्ब्ल्यू. बुश सहा हजार सैनिकांना घेऊन पश्चिम आशियात तैनात करण्यात आली आहे. याखेरीज अमेरिकी लष्कराच्या ८२व्या एअरबॉर्न डिव्हिजनचे हजारो सैनिकही पश्चिम आशियात पोहोचले आहेत. त्याशिवाय २५०० मरिन कमांडोंना घेऊन एक युद्धनौका युद्धग्रस्त भागात पोहोचली आहे. इराणवर लष्करी कारवाई करून खार्ग बेट ताब्यात घेण्याचा मनोदय ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. मात्र, सध्या पाठविण्यात आलेले सैनिक नेमके कुठे जाणार आणि काय करणार, याचे तपशील अमेरिकी लष्कराने जाहीर केलेले नाहीत.

तेल अवीव : इराणच्या कुद्स फोर्स या विभागाचा वरिष्ठ कमांडर इस्रायली लष्कराने बुधवारी मारला. मेहदी वफाएई असे मारल्या गेलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, ते कुद्स फोर्सच्या लेबनॉन कोअरच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख होते. महल्लत भागात इस्रायलने केलेल्या अचूक लक्ष्यभेदी हल्ल्यात वफाएई मारले गेले. लेबनॉन आणि सीरियामध्ये भूमिगत प्रकल्प उभारणीच्या मोहिमेचे नेतृत्व वफाएई यांच्याकडे होते. त्याशिवाय मंगळवारी इस्रायली लष्कराने हमासच्या नौदलाचा दहशतवादी इब्राहीम अल् खल्दी यालाही ठार मारले.