इराणचा कुवेत विमानतळावर हल्ला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पश्चिम आशियात युद्धाचे वातावरण तापले आहे. यामुळे संयुक्त अरब अमिरातीने इराणी नागरिकांवर प्रवास बंदी घातली आहे. इराणने तेलवाहू जहाजांवर हल्ले केले. कुवेत विमानतळालाही लक्ष्य करण्यात आले. लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. या घडामोडींमुळे प्रदेशात तणाव वाढला आहे.

इराणचा कुवेत विमानतळावर हल्ला

दुबई : पश्चिम आशियातील युद्ध तीव्र झाल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीने इराणी नागरिकांना देशात प्रवेश करण्यास किंवा देशातून प्रवास करण्यास प्रतिबंध केला असल्याचे तीन प्रमुख विमान कंपन्यांनी बुधवारी सांगितले. लांब पल्ल्याच्या एमिरेट्स आणि एतिहाद या विमान कंपन्यांसह कमी खर्चिक कंपनी फ्लायदुबईने आपल्या संकेतस्थळांवर ही घोषणा केली आहे. गोल्डन व्हिसा अर्थात, १० वर्षांच्या वास्तव्याचा परवाना असलेल्या नागरिकांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.

इराणने बुधवारी कतारच्या किनारपट्टीजवळ एका तेलवाहू जहाजावर हल्ला केला, तसेच कुवेतच्या विमानतळालाही लक्ष्य केले. दुसरीकडे, हवाई हल्ल्यांनी तेहरानला हादरवले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याच्या दिशेने जवळपास तयार असल्याचे सांगितल्यानंतर काही तासांतच हे हल्ले सुरू झाले.

‘कतारच्या किनारपट्टीजवळ एका तेलवाहू जहाजावर क्रूझ क्षेपणास्त्राचा हल्ला झाला’, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. सरकारी मालकीच्या कतारएनर्जीने करारबद्ध केलेल्या या तेलवाहू जहाजावर २१ कर्मचारी होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आदल्याच दिवशी दुबईजवळ कुवेतच्या तेलाने पूर्ण भरलेल्या एका तेलवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला होता. युद्धादरम्यान इराणने २०हून अधिक जहाजांवर हल्ला केला. ‘संयुक्त अरब अमिराती येथील फुजैराहमध्ये पाडलेल्या ड्रोनचे अवशेष अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टाकीवर ड्रोनचा हल्ला झाला. यामुळे मोठी आग लागली’, असे कुवेतची सरकारी वृत्तसंस्था कुनाने म्हटले आहे. सौदी अरेबियामध्ये दोन ड्रोन रोखण्यात आले, तसेच, इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे वाजले, मात्र नुकसान किंवा जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही.

लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात पाच ठार

लेबनॉनमध्ये बैरुत येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान पाच जणांचा मृत्यू झाला. युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच इराणशी संबंधित हिजबुल्ला या दहशतवादी गटाने उत्तर इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केल्यानंतर इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर आक्रमण केले.