फुटबॉल वर्ल्ड कपपासून इटली संघ दूरच

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये इटली संघाला पुन्हा एकदा पात्रता फेरीतून बाहेर पडावे लागले. चार वेळा विश्वचषक जिंकणारा हा संघ सलग तीन स्पर्धांसाठी पात्र ठरू शकला नाही. बोस्निया-हर्झेगोविनाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीचा पराभव झाला. या निकालामुळे इटलीमध्ये तीव्र नाराजी पसरली असून फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. देशातील फुटबॉलमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.

italys misfortune continues as world cup qualification fails again

चार वेळा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेल्या इटलीवर पुन्हा पात्रता स्पर्धेतच गारद होण्याची वेळ आली. सलग तीन स्पर्धांना अपात्र ठरलेले पहिले माजी विजेते या नामुष्कीस इटलीस सामोरे जावे लागले.

इटलीला मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या लढतीत बोस्निया-हर्झेगोविनाविरुद्ध पेनल्टी शूटआउटवर १-४ अशी हार पत्करावी लागली. गेल्या दोन स्पर्धांच्या वेळी स्वीडन आणि उत्तर मॅसेडोनियाने इटलीचे आव्हान संपवले होते. यापूर्वी इटली २०१४च्या स्पर्धेत खेळले होते. बोस्नियाचा संघ केवळ तेव्हाच यापूर्वी वर्ल्ड कप खेळला होता.

इटलीने १९३४, १९३८, १९८२, २००६मध्ये वर्ल्ड कप उंचावला आहे, तर १९७०, १९९४चे ते उपविजेते आहेत. वर्ल्ड कप पात्रता पुन्हा दुरावल्यामुळे इटलीत संतापाची लाट उसळली आहे. इटली फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांपासून ते क्रीडा मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत मागणी होत आहे. सत्ताधारी आघाडीतील पक्षांनी इटलीतील फुटबॉलमध्ये आमूलाग्र बदल हवा, असे सांगतानाच इटली फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांना दूर करण्याबाबत पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पत्र लिहिले.