नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने केलेल्या गुन्ह्याचा विषय बुधवारी संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. ‘आस्था किंवा श्रद्धा ही आपली ताकद आहे; मात्र तिचा गैरवापर समाज आणि लोकशाही दोघांसाठीही घातक आहे’, असे काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी राज्यसभेत सांगितले. मात्र, पाटील यांच्या मूळ भाषणातील खरात या भोंदू गुन्हेगाराचे नावच राज्यसभा सचिवालयाने वगळल्याचे समजते.
पाटील यांनी शून्य प्रहरात महिलांच्या शोषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित करताना असे वाढते प्रकार समाजस्वास्थ्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील, पुरोगामी वारसा सांगणाऱ्या राज्यातील नाशिक व इतरत्र समोर आलेल्या घटना भयावह असल्याचे त्या म्हणाल्या. अलीकडेच नाशिकमध्ये घडलेल्या एका प्रकरणाने समाजाला हादरवले असून, श्रद्धेचा गैरवापर करून महिलांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याच्या घटना समोर येत आहेत.
भारतीय संविधान न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित असून, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची जबाबदारीही नागरिकांवर आहे. मात्र, अंधश्रद्धा आणि भीतीमुळे या मूल्यांना तडा जात असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून समाजातील नैतिकतेशी संबंधित गंभीर मुद्दा आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत असून, पीडितांना तक्रार करताना सामाजिक दबाव आणि बदनामीला सामोरे जावे लागते, असे पाटील यांनी अधोरेखित केले.





