अजित पवार यांच्या अपघाती निधनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उठलेली वादळे शमण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्राने राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपांच्या मालिकेतील नवा भूकंप झाल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्या या पत्रात पक्षाचे पदाधिकारी व शिखर समितीत त्यांच्या व्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, सुबोध मोहिते, शिवाजीराव गर्जे, सरोज अहिरे, सना मलिक, जय अजित पवार व धीरज शर्मा हे आहेत. यात प्रफुल्ल पटेल व तटकरे यांचा एकही कट्टर समर्थक नाही. धीरज शर्मा हे कोणाच्या पारड्यात आयत्यावेळी वजन टाकतील याची शाश्वती पक्षात कोणालाही नाही. तसेच छगन भुजबळ हेदेखील प्रसंगी सुनेत्रा पवार यांच्याच पारड्यात वजन टाकू शकतात. उर्वरित सर्व सदस्य हे सुनेत्रा पवार यांच्याच मर्जीतले असल्याने पक्षावर त्यांची पूर्ण पकड आल्याचे बोलले जाते. सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, पवार यांच्या निवडीवर आयोगाने शिक्कामोर्तब केल्याने हा प्रश्न निकालात निघाला आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या पत्राची जी प्रत आज रोहित पवार यांच्यापाशी आहे, ती निवडणूक आयोगाने पोच दिलेली प्रत असून ती प्रत सुनेत्रा पवार यांच्याच खास मर्जीतील लोकांशिवाय त्यांच्याकडे पोहोचू शकत नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या जवळ जात आहेत किंवा कसे, असाही एक संभ्रम पक्षात अनेकांना सतावत आहे.
पवार यांच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील जवळपास सर्व नेते दोन्ही पक्षांचे विलीनकरण व्हावे ही अजित पवार यांची इच्छा होती, त्यासाठी वारंवार बैठका झाल्याचे सांगत होते. मात्र, दुसरीकडे अशाप्रकारच्या बैठकींची कुठलीच माहिती दादांनी दिली नसल्याचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सांगत होते.





