पटेल, तटकरे पदच्युत?

महाराष्ट्र टाइम्स

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे वादळ सुरू झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नाही. यामुळे पक्षात नवी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांच्या मते, त्यांच्या निवडीवर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. पक्षावर त्यांची पूर्ण पकड आल्याचे बोलले जात आहे.

new storm over praful patel and sunil tatkare in ncp

राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे यांना हटविण्यात आले किंवा कसे, या प्रश्नामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे वादळ सुरू झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला १० मार्च रोजी दिलेल्या पत्रात त्या स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष व शिवाजीराव गर्जे खजिनदार ही दोनच पदे पेनाने नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे पटेल व तटकरे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून यातून पक्षात नवी फूट पडते की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

सुनेत्रा पवार यांनी २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्याविषयीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला माहिती देण्यासाठी सादर केलेल्या पत्रात पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे त्यांचे पदच लिहिलेले नसल्याने या दाव्याला बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. १० मार्च रोजी आयोगाला सादर केलेल्या पत्रात सुनेत्रा पवार या अध्यक्ष तर शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष म्हणून नमूद आहे तर पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे पदच लिहिण्यात आलेले नाही. याच पत्रात पवार यांनी २८ जानेवारीनंतर त्यांनी दिलेल्या पत्रापर्यंत करण्यात आलेला कुठलाही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असेही अधोरेखित केले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार पवार यांच्या निवडीवर आयोगाने शिक्कामोर्तब केल्याने हा प्रश्न निकालात निघाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या या पत्रात पक्षाचे पदाधिकारी व शिखर समितीत त्यांच्या व्यतिरिक्त प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, सुबोध मोहिते, शिवाजीराव गर्जे, सरोज अहिरे, सना मलिक, जय अजित पवार व धीरज शर्मा हे आहेत. यात प्रफुल पटेल व तटकरे यांचा एकही कट्टर समर्थक नाही. धीरज शर्मा हे कोणाच्या पारड्यात आयत्यावेळी वजन टाकतील याची शाश्वती पक्षात कोणालाही नाही. तसेच छगन भुजबळ हेदेखील प्रसंगी सुनेत्रा पवार यांच्याच पारड्यात वजन टाकू शकतात. उर्वरित सर्व सदस्य हे सुनेत्रा पवार यांच्याच मर्जीतले असल्याने पक्षावर त्यांची पूर्ण पकड आल्याचे बोलले जाते.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार या पत्राची जी प्रत आज रोहित पवार यांच्याकडे आहे ती निवडणूक आयोगाने पोच दिलेली प्रत असून ती प्रत सुनेत्रा पवार यांच्याच खास मर्जीतील लोकांशिवाय त्यांच्याकडे पोहोचू शकत नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या जवळ जात आहेत किंवा कसे, असाही एक संभ्रम पक्षात अनेकांना सतावत आहे.

आता सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्राने राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपाच्या मालिकेतील नवा भूकंप झाल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.