इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमध्ये चीनमध्ये पुन्हा एकदा चर्चेची फेरी सुरू झाली आहे. महिनाभरापासून सुरू असलेला संघर्ष थांबवून दोन्ही देशांत दीर्घकालीन युद्धबंदी घडवून आणण्यासाठी चीन मध्यस्थी करीत असल्याची माहिती पाकिस्तानच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
चीनमधील उत्तर भागातील उरुमकी येथे दोन्ही देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. सद्यस्थितीतील युद्ध थांबवणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानने २६ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानातील कथित दहशतवादी तळांविरुद्ध ‘ऑपरेशन गझब लिल-हक’ सुरू केल्यानंतर दोन्ही शेजारी देशांमधील ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा आहे.





