चित्रकला, सुडोकू, योगासनांमधून बौद्धिक चालना

Contributed byअनिकेत शास्त्री|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जागतिक ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त नागपूर विद्यापीठात विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. ऑटिझमबाधित मुलांसाठी चित्रकला, सुडोकू आणि योगासने उपयुक्त ठरतात. यातून त्यांची आकलन क्षमता विकसित होते. लवकर निदान आणि उपचाराने मुलांची शिकण्याची क्षमता वाढते. प्रयास स्कूलमध्ये ८८ मुले शिक्षण घेत आहेत. आनुवंशिक आणि पर्यावरणीय घटक ऑटिझमला कारणीभूत ठरू शकतात.

चित्रकला, सुडोकू, योगासनांमधून बौद्धिक चालना

आज, गुरुवारी जागतिक ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त सकाळी ११ वाजता प्रयास स्कुल फॉर चिल्ड्रन्स विथ स्पेशल नीड्सच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुनानक भवनात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कॉमहाड यूकेचे संचालक डॉ. उदय बोधनकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जया शिवलकर ऑटिझमबाधित मुले व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एसएसडी) बाधित मुलांसाठी जग हे शब्दांच्या पलीकडचे असते. सामान्य मुलांपेक्षा ऑटिझमग्रस्तांना आपापसात संवाद, सामाजिक वागणूक तसेच दैनंदिन आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. रंग, गंध, चव याची त्यांना पुरेसी समज नसते. अशा मुलांना स्पीच थेरेपी, चित्रकला, सुडोकू हा बौद्धिक खेळ, योगासनांचा प्रभावी वापर केल्यास त्यांची आकलन क्षमता विकसित होऊ शकते, असे ‘प्रयास’ स्कूल फॉर चिल्ड्रन्स विथ स्पेशल नीड्सचे संचालक रितेश दिवे यांनी सांगितले.

ऑटिझम हा एक मेंदूच्या विकासाशी संबंधित विकार आहे, जो सामाजिक संवाद, संवाद कौशल्ये आणि वर्तन यांवर परिणाम करतो. गेल्या काही वर्षांत या विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लवकर निदान आणि उपचारामुळे मुलांची शिकण्याची व परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढू शकते, असे मत ऑटिझमतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर’ (एएसडी) हा मज्जासंस्थेचा विकार म्हणजे ‘न्युरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर’ आहे. लोकसंख्येच्या जवळपास दोन ते तीन टक्के जणांना हा डिसऑर्डर असू शकतो. ऑटिझमची लक्षणे पालकांच्या लवकर लक्षात येत नाहीत. वयाच्या तिसऱ्या वर्षी ही लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात. तीन वर्षानंतर मूल अचानक बोलायचे थांबते. कानाची तपासणी केली, तरी त्यात दोष आढळत नाही. मुले आपल्या गरजा सांगत नाहीत. आंघोळ, जेवण यालाही मूल प्रतिकार करायला लागतात. दैनंदिन कार्यक्रम थोडा जरी बदलला, तरी त्यांना राग येतो. काही मुले त्यातून बरीच हिंसकही होतात. यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. शासकीय पातळीवर ऑटिझमवर जनजागृतीची गरज आहे. सोबतच यावर उपचार, आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. ‘एएसडी’ असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष शिक्षक प्रशिक्षणही आवश्यक आहे, असे ऑटिझमतज्ज्ञ डॉ. किरण बिनकर यांनी सांगितले. ऑटिझमबाधित मुलांसाठी शहरात प्रयास स्कूल ऑफ चिल्ड्रन्स विथ स्पेशल नीड्स या संस्थेच्या तीन शाळा आहेत. यामध्ये धरमपेठेतील बोले पेट्रोलपंपजवळ, धंतोलीतील अभ्यंकर स्मारकाजवळ, नंदनवन पोलिस ठाण्यांच्या मागे या संस्था आहेत. सध्या या शाळेत ८८ मुले शिक्षण घेत आहेत, अशी माहिती शाळेचे संचालक रितेश दिवे यांनी दिली. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एन्व्हॉयर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या (एनआयईएचएस) संशोधनानुसार, ऑटिझमचा विकार होण्यास आनुवंशिक आणि पर्यावरणीय घटक कारणीभूत ठरू शकतात. गरोदरपणात आईला झालेल्या संसर्गजन्य आजारांचा परिणाम आणि विशिष्ट औषधांचा वापरामुळे ऑटिझमचा धोका वाढतो. यात आनुवंशिकतेचादेखील मोठा प्रभाव पडू शकतो, असे बालरोगतज्ज्ञ अमोल घायवट म्हणाले.