यवतमाळ : साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख निश्चित झाली. तीन दिवसांनी लग्न यवतमाळातील सर्वांत प्रशस्त वातानुकूलित हॉलमध्ये व्हावे, अशी अट नियोजित वरासह त्याचे वडील, काका आणि मामाने घातली. ‘चर्चेतून आपण मार्ग काढू’, अशी गळ मुलीच्या वडिलांनी घातली; पण नियोजित वरासह नातेवाइकांनी थेट लग्न मोडण्याची धमकी दिली. याविषयीची तक्रार दाखल होताच मारेगाव पोलिसांनी नियोजित वरासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मयूर सुरेश गिरी (३३), सुरेश भाऊगीर गिरी (५५), नामदेव भाऊगीर गिरी (६७, सर्व रा. पिंपळगाव (यवतमाळ) व सतीश दिवाकर गिरी (४५, रा. चांदूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. साखरपुड्याच्या वेळी ‘आमची कुठलीही अट नाही,’ असे गिरी कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र, मयूरने ४ मार्च रोजी रात्री मोबाइलवर मुलीशी संपर्क साधून आपले लग्न यवतमाळातील सर्वांत प्रशस्त एसी हॉलमध्येच झाले पाहिजे, असे बजावले.

