पिंपरीत मुसळधार; पुनावळे भुयारी मार्ग ठप्प

महाराष्ट्र टाइम्स

पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार पावसामुळे पुनावळे भुयारी मार्गात पाणी साचले. यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी झाडे पडल्यानेही अडथळा निर्माण झाला. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाच्या तयारीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

heavy rain in pimpri causes suburban tunnel route blockage

पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका पुनावळे परिसराला बसला असून, भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली. अचानक पाणी साचल्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागली आणि दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

शहरात दुपारपासून पावसाचा जोर कायम असल्याने भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी, दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही वाहनांनी पाण्यातच बंद पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. यामुळे वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक वळवण्याचा निर्णय घेऊन रावेत, भुमकर चौक आणि ताथवडे या मार्गांकडे वाहनांचा ओघ वळवला.

मात्र, पर्यायी मार्गांवरही वाहनांची संख्या वाढल्याने तेथेही कोंडीची स्थिती निर्माण झाली. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट झाली. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर घरी जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेक जण दोन ते चार तास वाहतूक कोंडीत अडकून पडले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या पावसाळ्यापूर्वीच्या अपुऱ्या तयारीवर नाराजी व्यक्त केली. भुयारी मार्गातील पाणी निचऱ्याची व्यवस्था सक्षम करण्याची मागणीही त्यांनी केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस आणि महापालिकेच्या पथकांनी प्रयत्न सुरू ठेवले असून, उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते.

सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, पिंपरी, भोसरी, चिखली, निगडी, चिंचवड अशा सर्वच भागांत अचानक आलेल्या पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पावसासोबतच सोसाट्याचा वारा असल्याने विविध भागांत झाडे पडण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, शहरात एकूण १२ ठिकाणी झाडे पडली असून, काही ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर परिसर, वाकड, जुनी सांगवीतील छावा चौक, दापोडीतील मयूर वाटिका परिसर व शितळा देवी चौक, फुगेवाडीतील आमंत्रण हॉटेल परिसर, पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, शिंदे नगर, जुनी सांगवी, रावेतमधील भालचंद्र विहार, दापोडीतील सिद्धार्थनगर, नेहरुनगर; तसेच निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेसमोर या भागांत झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. झाडे पडल्यामुळे काही मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. स्थानिक प्रशासन व अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. दरम्यान, ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवर पाणी साठल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले.