पोलिसांनी उतरवले‘व्हीआयपीं’चे दिवे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईत व्हीआयपींच्या वाहनांवरील लाल-निळ्या दिव्यांचा वापर पुन्हा चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवली. दोन दिवसांत ८० वाहनांवरील बेकायदेशीर दिवे आणि सायरन जप्त करण्यात आले. यात लोकप्रतिनिधी, मंत्री आणि व्हीआयपींच्या खासगी वाहनांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

mumbai police removes illegal lights from vip vehicles

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी वाहनांवर लावलेल्या लाल-निळ्या फ्लॅश लाइटनंतर व्हीआयपींच्या वाहनांवरील दिवे पुन्हा चर्चेत आले होते. ही व्हीआयपी संस्कृती रडारवर आल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत ८० वाहनांवरील दिवे उतरविले. यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री, व्हीआयपी व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाइकांच्या खासगी वाहनांचा समावेश आहे. पोलिसांनी या धडक मोहिमेत लाल, पिवळे आणि निळ्या रंगाचे ८० दिवे आणि तीन सायरन जप्त केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिस, पालिका, रुग्णालये, अग्निशमन दल अशा आपत्कालीन सेवा वगळता अन्य कुणालाही वाहनांवर कोणत्याही प्रकारचे दिवे वापरण्याची परवानगी नाही. पोलिसांनी वांद्रे आणि मरिन ड्राइव्ह परिसरात १, २ एप्रिल रोजी विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई केली.

पोलिसांनी खासगी वाहनांवरील दिवे उतरवतानाच त्यांच्या चालक आणि मालकांना दंड ठोठावला आहे. ज्या वाहनांवर कारवाई करण्यात आली, त्या वाहनांचा तपशील आरटीओकडे पाठविण्यात येणार असून, या वाहनांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस केली जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. इतकेच नाही तर पुढील कारवाईसाठी या वाहनांचे चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही हा अधिकारी म्हणाला.