अवकाळी पावसाने दाणादाण

महाराष्ट्र टाइम्स

विदर्भात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. नागपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक घरांचे छत उडाले, तर शेतातील गहू आणि हरभरा भिजून मातीमोल झाला. बाजार समित्यांमध्ये ठेवलेला मालही भिजला. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मेळघाटात गारपीट झाली. पपईची झाडे उन्मळून पडली.

unseasonal rains in vidarbha cause chaos

विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी पावसाने दाणादाण झाली. विजांच्या कडकडाटात पावसाच्या दमदार सरी कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. शेतातील कापणीला आलेला गहू मातीमोल झाला. बाजार समित्यांमध्ये ठेवलेला माल भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस बसलेल्या फटक्यातून सावरत नाही, तोच हे नवे संकट आल्याने शेतकरी हादरला आहे.

बुधवारी दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असताना, सायंकाळी ७ वाजतानंतर वातावरण अचानक बदलले. सोसाट्याचा वारा सुटल्याने हवेत धुळीचे प्रचंड लोळ उडाले. वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक भागांत घराबाहेरील साहित्य उडून गेले, तर झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर फांद्या पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर अनेक गावे अंधारात होती.

अमरावती शहर व परिसरात सुरुवातीला सलग दोन-अडीच तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतरही पहाटेपर्यंत पावसाच्या सरी बरसत होत्या. चिखलदरा, तिवसा, अंजनगाव सुर्जी व चांदूर बाजार हे काही तालुके वगळता उर्वरित सर्व जिल्ह्याला पावसाने झोडपले. चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, वरुड, धारणी आणि मोर्शी या तालुक्यांमध्ये पावसाचा तडाखा सर्वाधिक होता. मेळघाटातील चुरणी परिसरात गारपीट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील शेतकरी दिनेश निमकर यांच्यावर निसर्गाने घाला घातला आहे. त्यांच्या तीन एकर शेतातील सुमारे १,२००वर पपईची झाडे वादळी वाऱ्यामुळे मुळासकट उन्मळून पडली.

हिंगणघाट आणि सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हवामानाचा अंदाज घेता बाजार बंद होता. त्यामुळे जास्त आवक नव्हती; पण यार्डात बाहेर ठेवण्यात आलेला शेतमाल भिजला आहे. यात गहू आणि हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.