ठाण्यात जनगणना सुरू

महाराष्ट्र टाइम्स

ठाणे महापालिकेत जनगणना सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणी सुरू आहे. 'एचएलओ' ॲपद्वारे घरगणना केली जाईल. यात घरासंदर्भातील ३३ प्रश्नांची नोंद होईल. १ ते १५ मे दरम्यान स्वयं-जनगणना करता येईल. नागरिकांना युनिक कोड मिळेल.

advanced household census system launched in thane

ठाणे महापालिकेने आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने क्षेत्रीय प्रशिक्षकांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणी सुरू केली आहे. या कामासाठी नऊ प्रभाग समिती अंतर्गत एकूण ७८ क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी ३९ प्रशिक्षकांना पहिल्या सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहरात जनगणना मोहीम सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. माजीवाडा-मानपाडा, उथळसर, लोकमान्य-सावरकर, वर्तकनगर या भागातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले असून वागळे, नौपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उथळसर प्रभाग समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर घरगणना ('हाऊस लिस्टिंग') करण्यात आली. या उपक्रमातून प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन, प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

डिजिटल प्रणालीचा वापर

‘एचएलओ’ ॲपद्वारे घरगणना केली जाणार आहे.

या ॲपमध्ये नागरिकांच्या घरासंदर्भातील एकूण ३३ प्रश्नांची नोंद केली जाईल.

घराची मालकी, मालकाचे नाव, घराचे प्रकार तसेच घरातील टीव्ही, फ्रिज, मोबाइल इत्यादी माहितीची नोंद.

१ ते १५ मे या कालावधीत स्वयं-जनगणना करण्याची सुविधा.

जनगणना पोर्टलवर लॉग-इन करून स्वतःची माहिती भरता येणार.

प्रत्येक नागरिकाला ‘युनिक कोड’ प्रदान केला जाणार.

‘युनिक कोड’ नागरिक घरी येणाऱ्या प्रगणकाला उपलब्ध करून देतील व त्यानुसार त्यांची घरगणना पूर्ण होईल.