महात्मा जोतिराव फुले चौकातील फेरीवाले, पुतळ्यासमोरी दुचाकींचे पार्किंग, हातगाड्यांचा विळखा, कचऱ्याचे ढिगारे आणि नशेखोरांचा वाढता वावर वाढला आहे. त्यामुळे म. फुले यांच्या पुण्यतिथीच्या आधी या चौकाची तातडीने स्वच्छता करा, अशा सूचना महापौर हर्षाली थविल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
म, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या पार्श्वभूमीवर कल्याण स्थानक परिसराची महापौरांनी पाहणी केली. स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर अंकुश आणणे वाहतूक पोलिस , आरटीओ, पालिका प्रशासन आणि रिक्षा संघटना यांना शक्य झालेले नाही. त्यातच स्मार्ट सिटीच्या उड्डाणपुलाचे या परिसरात सुरू असल्याने बकाल रूप पाहावे लागत आहे. तसेच महात्मा फुले चौकात अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हे पाहताच महापौरांनी पार्किंग हटवून परिसराची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीकचे गाड्या व अन्य अतिक्रमण हटवण्याची सूचना केली.

