देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी असलेल्या टीसीएसने गुरुवारी २०२५-२६ या मागील आर्थिक वर्षाच्या जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीच्या निव्वळ नफ्यात १२.२२ टक्क्यांनी वाढ होऊन तो १३,७१८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चांगल्या आर्थिक निकालामुळे टीसीएसच्या संचालक मंडळाने प्रतिसमभाग ३१ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला असून, वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेनंतर तो दिला जाणार आहे. याखेरीज १ एप्रिलपासून कंपनीने सर्वच स्तरांतील कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ लागू केली आहे. ही माहिती कंपनीचे मुख्य मनुष्यस्रोत अधिकारी सुदीप कुन्नुमल यांनी दिली आहे.
टाटा समूहाच्या या कंपनीने गेल्या वर्षी जानेवारी-मार्च कालावधीत १२,२२४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, करपश्चात नफा ४९,२१० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

