ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात ड्रग्जचे सेवन करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. रात्री फ्लॅटफॉर्म क्र. २च्या बाजूला एक तरुण गांजाचे सेवन करताना पोलिसांना आढळून आल्यानंतर या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, स्टेशन परिसरात गर्दुल्ल्यांच्या वावरामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रभावी गस्त घालून ड्रग्ज सेवन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ठाणेनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी रात्रीच्या वेळी स्टेशन परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना फलाट क्र. २च्या लगत एसटी बस थांब्यासमोर चिलीम ओढणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण भिवंडीमध्ये राहत असून पोलिसांनी त्याची झडती घेतल्यानंतर गांजाचे पाकीट आणि अन्य साहित्य मिळाले. या तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या भागात गस्त वाढवावी, तसेच नशेबाजांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

