गेल्या वर्षभरात ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून विनातिकीट प्रवास करताना सहा हजारांहून अधिक प्रवासी पकडले गेले आहेत. या प्रवाशांकडून सुमारे १२ लाख ८७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून महिन्याला सरासरी पाचशेहून जास्त फुकटे प्रवासी पकडले जात असल्याचे दिसून येते.
सद्यस्थितीत ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात ४०७ बसेस असल्या तरी दररोज संचलनासाठी ३८०च्या आसपास बसेस उपलब्ध होत आहेत. या बसेसमधून प्रत्येक महिन्याला सरासरी २४ ते २५ लाख प्रवासी प्रवास करतात. दररोजचे परिवहनचे उत्पन्न सरासरी २६ ते २८ लाख असून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे.
महापालिकेच्या अनुदानावर भिस्त असलेल्या परिवहनला फुकट्या प्रवाशांमुळे आर्थिक फटका बसत आहे. परिवहन सेवेमध्ये ४२ तिकीट तपासनीस असून ८० कर्मचाऱ्यांवर तिकीट तपासणीची जबाबदारी आहे. त्यांनी ठोठावलेल्या दंडातून फुकट्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले आहे. यामुळे परिवहनचे मोठे नुकसान होत आहे.

