सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा आवडता आणि लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ’ हा आपल्या भन्नाट स्किट्स आणि अफलातून विनोदासाठी ओळखला जातो. ‘तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा’ असं ब्रीदवाक्य असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतो. हा शो दर सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजता सोनी मराठीवर प्रसारित होतो. या लोकप्रिय कार्यक्रमाच्या खास सेट भेटीचे आयोजन ‘ महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब ’च्या वतीने करण्यात आले आहे.
मंगळवार, १४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा सेट, मीरा रोड (पूर्व) येथे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी सेटचा अनुभव घेण्यासोबतच कार्यक्रमातील कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
या खास भेटीदरम्यान प्रेक्षकांना शोच्या निर्मिती प्रक्रियेबाबत जाणून घेता येणार असून, कलाकारांच्या विनोदी सादरीकरणामागील मेहनत आणि तयारी जवळून अनुभवता येणार आहे. त्यामुळे ही सेट भेट प्रेक्षकांसाठी एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव ठरणार आहे.
ही सेट भेट महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी असून, या उपक्रमासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. कार्यक्रमासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नावनोंदणीसाठी ९८१९५ ८१०७७ या क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज करावे.

