‘त्रिभाषा’ सहावीपासून

महाराष्ट्र टाइम्स

सीबीएसईने २०२६-२७ पासून इयत्ता सहावीत त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०३०-३१ पर्यंत हे सूत्र दहावीपर्यंत पूर्णपणे लागू होईल. नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांसाठी दोन स्तरांची परीक्षा पद्धत सुरू होईल. सर्व विद्यार्थ्यांसाठी ८० गुणांची सामान्य परीक्षा अनिवार्य असेल. या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या बहुआयामी शिक्षणाला चालना मिळेल.

implementation of cbse trilingual policy new education system from 2026 27

इयत्ता नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांसाठी दोन स्तरांची पद्धत लागू केली जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी ८० गुणांची सामान्य परीक्षा अनिवार्य असेल, तर प्रगत स्तरासाठी २५ गुणांची अतिरिक्त परीक्षा देता येईल. या प्रगत परीक्षेत मिळालेले गुण एकूण टक्केवारीत समाविष्ट केले जाणार नाहीत. मात्र, त्याची स्वतंत्र नोंद ठेवली जाईल.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ( सीबीएसई ) येत्या २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला असून, २०३०-३१ पर्यंत इयत्ता दहावीपर्यंत ही प्रणाली पूर्णपणे लागू होईल. विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या ४२ भाषांमधून तिसरी भाषा निवडावी लागणार आहे. मात्र, परदेशातून भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.

‘सीबीएसई’ने माध्यमिक शाळांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून नवा अभ्यासक्रम आराखडा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार असून, त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे बंधनकारक असेल.

तीन स्तरांत भाषांची विभागणी

भाषा विषय तीन स्तरांमध्ये विभागले जाणार आहेत. ‘आर-वन’ (पहिली भाषा) ही विद्यार्थ्यांची मुख्य भाषा उच्च स्तरावर शिकवली जाईल. ‘आर-टू’ (दुसरी भाषा) वेगळ्या स्तरावर असेल, तर ‘आर-थ्री’ (तिसरी भाषा) ही इयत्ता सहावीपासून अनिवार्य राहील. सन २०२८पासून इयत्ता नववीत ‘आर-वन’ आणि ‘आर-टू’ या दोन भाषा अनिवार्य असतील, तर सन २०३१पासून तिन्ही भाषांसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जाणार आहेत. हे सर्व बदल ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याशी सुसंगत असून, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित आणि बहुआयामी शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत.

वेळापत्रक संकेतस्थळावर

राज्यात इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही असणारे राज्य सरकार ‘सीबीएसई’च्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेणार, याकडे पालक आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे. या नव्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना माहिती मिळावी, यासाठी ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

‘प्रॅक्टिकल’वर भर

सामाजिक शास्त्र विषयांमध्ये विश्लेषण, केस स्टडी, नकाशा व माहिती विश्लेषण आणि वास्तव जीवनातील उपयोग यावर अधिक भर दिला जाणार आहे. परीक्षा पद्धत मात्र ८० गुण लेखी आणि२० गुण अंतर्गत अशीच राहणार आहे.

इयत्ता नववीपासून गणित आणि विज्ञान विषयांसाठी दोन स्तरांची पद्धत लागू केली जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी ८० गुणांची सामान्य परीक्षा अनिवार्य असेल, तर प्रगत स्तरासाठी २५ गुणांची अतिरिक्त परीक्षा देता येईल. या प्रगत परीक्षेत मिळालेले गुण एकूण टक्केवारीत समाविष्ट केले जाणार नाहीत. मात्र, त्याची स्वतंत्र नोंद ठेवली जाईल.