शहरातील नागरिकांसाठी आणि विशेषतः नोकरदार व व्यापाऱ्यांसाठी टपाल विभागाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. ग्राहकांची सोय आणि वित्तीय सेवांची सुलभता लक्षात घेत नागपूर शहर मुख्य टपाल कार्यालय (इतवारी) येथील वित्तीय सेवा केंद्रांच्या कामकाजाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. नवीन वेळेनुसार आता सायंकाळी ७.३० वाजतापर्यंत वित्तीय सेवा केंद्र सुरू राहणार आहे.
नागपूर विभागाचे डीपीएस डॉ. सुधीर जाखरे यांच्या मार्गदर्शनात हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. नवीन निर्णयानुसार, आता हे सेवा केंद्र सर्व कामकाजाच्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजतापर्यंत सुरू राहील. अनेकदा व्यावसायिक व्यस्तता किंवा वैयक्तिक कामांमुळे सामान्य नागरिकांना कार्यालयीन वेळेत (दुपारी ४ वाजतापर्यंत) टपाल कार्यालयात पोहोचणे शक्य होत नाही. अशा ग्राहकांची अडचण ओळखून प्रशासनाने हा वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीव वेळेत ग्राहकांना विविध सेवांचा लाभ घेता येईल. यामध्ये नवीन खाते उघडणे व केवायसी अपडेट करणे. आवर्ती ठेव (आरडी), मुदत ठेव (टीडी) आणि इतर बचत योजनांमध्ये पैसे भरणे, खात्यातून रक्कम काढणे, तसेच टपाल विभागाशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार करता येतील. टपाल विभाग हा नेहमीच सामान्य माणसाचा आधार राहिला आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि ग्राहककेंद्रित सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे या उपक्रमाबाबत बोलताना विभागातर्फे सांगण्यात आले. इतवारी परिसरातील व्यापारी वर्ग तसेच सामान्य नागरिकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची असून, यामुळे टपाल कार्यालयातील गर्दीचे नियोजन होण्यासही मदत होईल. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागातर्फे करण्यात आले आहे.





