नागपूर : प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर (ग्रामीण) यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत वार्षिक उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे १०१ टक्के वसुली साध्य केली आहे. शासनाने दिलेल्या ३१९.१५ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ३२१.१९ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. एकूण विभागाच्या पातळीवर ४६६.२५ कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४७२.८७ कोटी रुपयांची वसुली होत १०१ टक्के कामगिरी झाली. मागील २०२४-२५ या वर्षात विभागाने ४५६.७१ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४०२.३२ कोटींची (८८ टक्के) वसुली केली होती. यंदा त्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) यांनी मागील वर्षाच्या तुलनेत महसूल वसुलीत सुमारे १२ टक्क्यांनी वाढ केली आहे, असे आरटीओकडून सांगण्यात आले.





