ताम्हाणे पिता-पुत्रांची आयर्नमॅन मोहीम पूर्ण

महाराष्ट्र टाइम्स

पुण्यातील विष्णू ताम्हाणे आणि त्यांचे पुत्र गौरांग ताम्हाणे यांनी न्यूझीलंडमध्ये आयर्नमॅन शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली. या शर्यतीत पोहणे, सायकलिंग आणि धावणे यांचा समावेश होता. दोघांनीही १७ तासांच्या आत हे आव्हान पेलले. विष्णू यांनी १६ तास ३४ मिनिटांत तर गौरांगने १६ तास ३० मिनिटांत शर्यत जिंकली. दशरथ जाधव यांनीही आयर्नमॅन किताब मिळवला. या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली.

tamhane father son team completes ironman challenge

विष्णू ताम्हाणे आणि गौरांग ताम्हाणे या पित्रा-पुत्रांनी न्यूझीलंडमध्ये झालेल्या आयर्नमॅन शर्यत पूर्ण केली. ५८ वर्षीय विष्णू राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर १९ वर्षीय गौरांग शिक्षण पूर्ण करीत आहे.

या शर्यतीत चार किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे अशा तीन क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. हे एकूण २२६ किलोमीटर अंतर १७ तासांच्या आत पूर्ण करणे गरजेचे असते. जगभरातून या स्पर्धेत ११४९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात गौरांग ९७०व्या क्रमांकावर राहून, तर विष्णू यांनी ९७४व्या क्रमांकावर राहून शर्यत पूर्ण केली. अर्थात, यात क्रमांक महत्त्वाचा नसून, वेळेत शर्यती संपविणे गरजेचे असते. गौरांगने १६ तास ३० मिनिटे २१ सेकंदांत हे अंतर कापले, तर विष्णू यांनी १६ तास ३४ मिनिटे ३३ सेकंदांत शर्यती पूर्ण केल्या. पुण्यातील आणखी एक स्पर्धक दशरथ जाधव यांनी पुन्हा एकदा आयर्नमॅन किताब मिळवला.

या विषयी अधिक माहिती देताना विष्णू म्हणाले, ‘तेथील परिस्थितीशी जुळवून घेऊन स्पर्धा ठरावीक कालावधीत पूर्ण करणे, हेच मोठे आव्हान असते. या शर्यतीत शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी लागते. मात्र, आमची तयारी उत्तम झाली होती. कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही, हे निश्चित केले होते. त्यामुळेच यश मिळाले. यासाठी मला माझ्या वरिष्ठांचे आणि प्रशिक्षक विजय गायकवाड, चैतन्य वेल्हाळ, संजिवन वालावलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.’

गौरांग म्हणाला, ‘वयाच्या १८व्या वर्षीच मला आयर्नमॅन किताब मिळवायचा होता. मात्र, ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेपूर्वीच अपघात झाल्याने ती शर्यत पूर्ण करू शकलो नव्हतो. मात्र, मी हार मानली नाही. दुप्पट मेहनत घेऊन न्यूझीलंडमध्ये दाखल झालो होतो. अपयश आल्यानंतर खचून जाऊ नये, हे यातूनच मला शिकायला मिळाला. आता कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे माझे लक्ष्य आहे.’ भारताचे अनंत राणा, सिद्धार्थ मंडलीक, जय पोटे, हार्दिक पाटील, अरिंदम दास यांनीही सतरा तासांच्या आत ही शर्यत पूर्ण केली.