नागपूर : घरफोडी च्या घटनेनंतर लकडगंज पोलिसांनी अवघ्या सहा तासांत दोन घरफोड्यांना बेड्या ठोकल्या. शबीब अहमद ऊर्फ सिब्बू अब्दुल मतीन शेख (वय ३३, रा. सतरंजीपुरा) व मोहम्मद अमान मतीन शेख (वय २५, रा. मारवाडी चौक, लकडगंज) अशी अटकेतील घरफोड्यांची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी सतरंजीपुऱ्यातील मामा गल्ली येथील अर्शिया रफीख खान (वय ४६) यांच्याकडे घरफोडी करून चोरट्याने २ लाख ८० हजारांची रोख व सोन्याचे दागिने चोरी केले. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर, साहाय्यक निरीक्षक अजहर शेख, हेडकॉन्स्टेबल उमाकांत नागदेवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन अवघ्या सहा तासांत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाखांची रोख व दागिने असा एकूण अडीच लाखांचा ऐवज जप्त केला.





