रुग्णालयाच्या दारातच अवैध औषधांचे स्टॉल

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईतील महापालिका रुग्णालयांच्या बाहेर बनावट औषधांची विक्री सुरू आहे. डॉक्टरांकडून उपचार घेऊन बाहेर पडणाऱ्या रुग्णांना लक्ष्य केले जाते. अन्न व औषध प्रशासनाची परवानगी नसलेली ही औषधे सुरक्षारक्षकांच्या समोर विकली जातात. लोकमान्य टिळक, कांदिवली शताब्दी, केईएम रुग्णालयांच्या परिसरात हे चित्र सर्रास दिसते. या विक्रेत्यांचा दावा आहे की त्यांची औषधे स्वस्त आणि प्रभावी आहेत. या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

illegal medicine sales at hospital gates a serious health threat

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून औषधोपचार घेतल्यानंतर तिथून बाहेर येणाऱ्या रुग्णांना प्रवेशद्वारावर बनावट औषधे , वेदनाशामक तेले, लेप, गोळ्यांची विक्री करणारे अडवतात. अन्न व औषध प्रशासनाची कोणतीही परवानगी नसलेल्या या औषधांची विक्री रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षारक्षकांच्या समोरच केली जाते. ‘आम्ही कुणालाही जबरदस्ती करत नाही. महापालिका रुग्णालयाबाहेर इतके स्टॉल विक्रीसाठी असतात, त्यात आम्हीही लोकांना दिलासा देणारी ही औषधे विकली तर काय झाले?,’ असा प्रतिप्रश्न या विक्रेत्याकंडून केला जातो. मात्र असे स्टॉल लावून रुग्णांची दिशाभूल करणारी औषधे रुग्णालय परिसरामध्ये विकण्याची मुभा कोणाच्या आशिर्वादाने मिळते, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकमान्य टिळक, कांदिवली शताब्दी, केईएम रुग्णालयाच्या परिसरामध्ये अशी वेदनाशामक मलमे, औषधे, गोळ्या तसेच, स्प्रे विक्री करणारे आणि या औषधांमुळे आजार शंभर टक्के बरा होतो, असा दावा करणारे विक्रेते आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी या औषधांची जोरदार विक्री होत असल्याचे सांगितले. ‘रुग्णालयातून बाहेर येणाऱ्या रुग्णांना आम्ही जबरदस्ती करत नाही. या औषधांचे मोफत प्रात्यक्षिक देतो. त्यांना पटले तर ते औषध विकत घेतात. या औषधांच्या किंमतीही कमी असल्याने मागणी मोठी असते,’ अशीही माहिती त्यांनी दिली. यातला एक थेंब हाताला लावला जातो. काहीजण सवयीप्रमाणे त्याचा गंध कसा असतो, हे पाहण्यासाठी हात नाकाजवळ नेतात. त्याच्या भपक्याने गरगरल्यासारखे होते. ‘हा त्रास केवळ एक मिनिटासाठी आहे, नंतर तो बरा होतो,’ असेही मार्केटिंग केले जाते.

टिळक रुग्णालयाबाहेर अवैध मलम-औषधांची विक्री करणाऱ्या व्यक्तीने ‘पन्नास ते शंभर रुपयांची ही औषधे आहेत. काही रुग्ण लंगडत येतात, काहींना दुखणी खुपणी असतात. त्यांना या औषधांमुळे दिलासा मिळत असेल तर वाईट काय आहे?,’ असा प्रतिप्रश्न केला. ‘आम्हाला सुरक्षारक्षकांनीही कधी हटकले नाही,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

कांदिवली शताब्दी रुग्णालयाबाहेर अशा विक्रेत्याला कुणी तिथून जा म्हटल्यानंतर दुसऱ्या रुग्णालयाबाहेर जागा शोधतो. ‘आमच्याकडे केवळ एक छोटे टेबल असते. त्यामुळे जागाही फारशी लागत नाही. या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण गरीब असतात. त्यामुळे त्यांना बाहेरून औषधे लिहून दिली तर ती विकत घेण्याची त्यांची परिस्थिती नसते. त्यापेक्षा अशा स्वस्त औषधांनी त्यांचा आजार बरा होतो,’ असा दावा त्यांनी केला.

रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी इतकी असते की वैद्यकीय उपचार करताना डॉक्टरांना वेळ मिळत नाही. त्यामुळे ज्या विभागाला या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत, त्यांनी ही जबाबदारी पार पाडली जाते का, याकडे गांभीर्याने पाहायला हवे, अशी अपेक्षा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.