टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) कॅम्पबेल विल्सन यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचे एअर इंडियाने सांगितले.
मूळचे न्यूझीलंडचे रहिवासी आणि ‘सिंगापूर एअरलाइन्स’चे अनुभवी अधिकारी असलेले विल्सन गेल्या चार वर्षांपासून एअर इंडियाचे नेतृत्व करत होते. विल्सन यांनी पद सोडण्याचा आपला मानस २०२४मध्येच एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याकडे व्यक्त केला होता. तेव्हापासून ते ही संक्रमण प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रयत्नशील होते. एअर इंडियाच्या बोर्डाने एक समिती स्थापन केली असून ती येत्या काही महिन्यांत उत्तराधिकाऱ्याचा शोध घेईल, असे एअर इंडियाने म्हटले आहे. सरकारी मालकीच्या एअर इंडियाचे खासगीकरण झाल्यानंतर सप्टेंबर २०२२मध्ये विल्सन यांनी पदभार स्वीकारला होता. नवीन उत्तराधिकाऱ्याची घोषणा होत नाही, तोपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विल्सन यांच्या योगदानाचे टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी कौतुक केले आहे. एअर इंडिया च्या खासगीकरणानंतर चार वर्षांत चार विमान कंपन्यांचे यशस्वी विलीनीकरण झाले. दरम्यान, एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ला देखील १९ मार्चपासून प्रमुख नाही.

