जम्मूहून थेट काश्मीर खोऱ्यात पोहोचणाऱ्या ‘ वंदे भारत एक्स्प्रेस ’ला गुरुवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या वेळी पूंछ, राजौरी आणि उरीसारख्या दुर्गम भागांना देशाच्या रेल्वे जाळ्याशी जोडण्यावर भर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे दुव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पूंछ-राजौरी भागाला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी, तसेच उरीपर्यंत रेल्वेमार्ग विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग आदी उपस्थित होते. जम्मू आणि श्रीनगरदरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू झाल्याने दोन्ही राजधान्यांमधील प्रवासाचा कालावधी कमी होणार असून पर्यटनाला चालना मिळेल. तसेच वर्षभर अखंड वाहतूक उपलब्ध होणार आहे. जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेसच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय कडेकोट व्यवस्था उभारण्यात आली असून ‘कोरास’ कमांडोंसह एकूण २१ सुरक्षा जवान तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जून २०२५ रोजी कटरा-श्रीनगर दरम्यानच्या वंदे भारत सेवेला प्रारंभ केला होता. आता ही सेवा जम्मू तवी स्थानकापर्यंत वाढविण्यात आली आहे.






