बेंगळुरूला पावसाने झोडपले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूला बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. जोरदार वारे आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे विविध घटनांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला. रस्ते, भुयारी मार्ग जलमय झाले. रुग्णालयाची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. विजेच्या धक्क्यानेही काही जणांचा बळी गेला. शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते.

बेंगळुरूला पावसाने झोडपले

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूला बुधवारी सायंकाळी जोरदार वारे आणि गारपिटीसह आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते, मेट्रो स्थानके, भुयारी मार्ग जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. विधानसौधामध्येही पाणी शिरले.

पावसाच्या माऱ्यामुळे बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने सहा वर्षांच्या मुलीसह सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अभ्यास दौऱ्यावर आलेल्या केरळमधील दोघांचा समावेश होता. पावसापासून बचावासाठी ते या भिंतीच्या आडोशाला उभे असतानाच, भिंत कोसळली. या दुर्घटनेत अन्य सात जण जखमी झाले आहेत.

वेगा सिटी मॉलजवळील बाणेरगट्टा रोडवर एकाचा, तसेच यारब नगर येथे एका विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. चामराजपेट येथे घराच्या छतावर सिमेंटचा तुकडा पडल्याने एक जण मृत्यूमुखी पडला. बेंगळुरूतील महत्त्वाचे चौक आणि भुयारी मार्ग जलमय झाले.