‘ जैश-ए-महंमद ’ या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मौलाना सलमान याचा पाकिस्तानातील बहावलपूर येथे बुधवारी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. सलमान हा ‘जैश’ चा प्रमुख मसूद अजहरचा अत्यंत विश्वासू सहकारी होता. भारतीय भूमीवर झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामध्ये प्रामुख्याने सन २००१मधील संसदेवरील हल्ला आणि सन २०१९मधील पुलवामा येथील ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावरील भीषण हल्ल्यांचा समावेश होता. भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जैशच्या बहावलपूर मुख्यालयावर झालेल्या बॉम्बफेकीत सलमान जखमी झाला होता.






