‘त्यांची’ जागा होर्मुझच्या तळाशी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ आणि डेमोक्रॅट खासदारांमध्ये इराण युद्धावरून वाद झाला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी अमेरिकेला पर्शियन आखातात स्थान नसल्याचे म्हटले. रशियाने इराणच्या युरेनियम साठ्यासाठी मदतीची तयारी दर्शवली. इस्रायलविरोधात हिजबुल्लाहने लहान ड्रोन वापरले. या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे.

‘त्यांची’ जागा होर्मुझच्या तळाशी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांचा डेमोक्रॅट खासदारांसोबत वादविवाद झाला. लोकप्रतिनिधी सभेच्या सशस्त्र सेवा समितीच्या सुनावणीदरम्यान इराण युद्धाबाबत नागरिकांची दिशाभूल केल्याच्या आणि वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याच्या आरोपांना त्यांना सामोरे जावे लागले. सहा तास चाललेल्या सुनावणीत वातावरण तापले. यामध्ये ट्रम्प प्रशासनाच्या १,५०० अब्ज डॉलरच्या संरक्षण अर्थसंकल्पावर चर्चा झाली. युद्ध सुरू झाल्यापासून हेगसेथ प्रथमच समितीला सामोरे गेले. पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी इराण युद्धाचा खर्च २५ अब्ज डॉलर इतका सांगितला, परंतु अनेक डेमोक्रॅटिक खासदारांनी त्यावर साशंकता व्यक्त केली. त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून हेगसेथ यांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या पदासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत की नाही, असा प्रश्न केला. यावर हेगसेथ यांनीही पलटवार केला. ‘ट्रम्प हे गेल्या अनेक पिढ्यांमधील सर्वांत तीक्ष्ण बुद्धीचे आणि सर्वाधिक प्रेरणादायी अध्यक्ष आहेत. तुम्ही माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या क्षमतेवर कधी प्रश्न उपस्थित केले होते का,’ अशी विचारणा त्यांनी केली.

‘होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या नियंत्रणात कायम असल्याने पर्शियन आखातात अमेरिकींचे स्थान केवळ या पाण्याच्या तळाशी आहे. या प्रदेशाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जात आहे,’ असे वक्तव्य इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी गुरुवारी केले. तसेच ‘इराण आपल्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेचे राष्ट्रीय संपत्ती म्हणून संरक्षण करेल,’ असेही त्यांनी अधोरेखित केले.

खामेनी यांनी लेखी निवेदन इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर वाचून दाखवले. ‘देशाच्या आत आणि बाहेर राहणारे ९ कोटी गौरवशाली आणि सन्माननीय इराणी नागरिक, इराणच्या ओळखीवर आधारित सर्व आध्यात्मिक, मानवी, वैज्ञानिक, औद्योगिक आणि तांत्रिक क्षमता, म्हणजे नॅनोटेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीपासून अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेपर्यंत राष्ट्रीय संपत्ती मानतात,’ असेही खामेनी यांनी नमूद केले. ‘देवाच्या कृपेने आणि शक्तीने, पर्शियन आखाती प्रदेशाचे भविष्य उज्ज्वल आहे. ते अमेरिकेविना असेल आणि ते तेथील जनतेच्या प्रगती, सुख-सुविधा आणि समृद्धीसाठी असेल,’ असे खामेनी यांनी निवेदनात म्हटले आहे. पर्शियन आखात व ओमानच्या आखाताशी संबंधित देशांचे भवितव्य एकच आहे. हजारो किलोमीटर दूरवरून लोभ आणि द्वेषबुद्धीने येणाऱ्या परकीयांना येथे स्थान नाही. त्यांचे स्थान केवळ पाण्याच्या तळाशी आहे,’ असे त्यांनी सांगितले.

रशिया मदतीसाठी तयार

वॉशिंग्टन : ‘रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी झालेल्या दूरध्वनी संभाषणात इराणच्या ९७० पौंड समृद्ध युरेनियमचा साठा सांभाळण्यासाठी तिसरा देश म्हणून तयारी असल्याचे पुन्हा अधोरेखित केले,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. युरेनियमचा साठा अमेरिकेला सोपवण्याची मागणी ट्रम्प करत आहेत. ‘आम्ही यामध्ये तुमची मदत करू इच्छितो. युरेनियम संवर्धनात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहोत, असे पुतिन म्हणाले,’ असे ट्रम्प यांनी सांगितले.

इस्रायलविरोधात नवे ड्रोन

तेल अविव : हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये युद्धासाठी लहान आकाराच्या ड्रोनचा वापर केला आहे. ते ‘फायबर ऑप्टिक’ तारेद्वारे नियंत्रित केले जाते. ते इलेक्ट्रॉनिक तपासणीतूनही निसटतात. युक्रेन युद्धात व्यापक प्रमाणात वापरण्यात आलेले हे ड्रोन आकाराने लहान आहेत. त्यांचा शोध घेणे कठीण होते आणि ते खूप धोकादायक आहेत.