‘ एग्झिट पोल हे एक थोतांड असून अनेक संस्थांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत जे काही अंदाज वर्तविण्यात आले आहेत, त्यावर आमचा विश्वास नाही,’ अशी टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये कायमच मोठ्या संख्येने मतदान होते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
‘तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी भाजपच्या निर्देशानुसार एग्झिट पोलचे अंदाज जाहीर केले जात आहेत. मात्र, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस २९४ पैकी २२६हून अधिक जागा जिंकेल,’ असा ठाम विश्वास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीमध्ये ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी ‘एक्स’वर त्यांनी व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला.
‘वाहिन्यांवर जे निवडणूक निकालांचे अंदाज दाखवले जात आहेत, ते भाजपच्या कार्यालयातूनच प्रसारित करण्यात आले आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. ‘वाहिन्यांवरील अंदाज दुपारी १ वाजून ८ मिनिटांनी भाजपच्या कार्यालयातूनच देण्यात आले होते. हे अंदाज टीव्हीवर दाखवले जावेत, यासाठी पैसेही दिले गेले. माझ्याकडे याबाबतची ठोस माहिती आहे,’ असा असे त्या म्हणाल्या. २९४ सदस्यांच्या विधानसभेत तृणमूल काँग्रेस दोन-तृतीयांश बहुमताचा टप्पा सहजपणे गाठेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०० जागांचा टीव्हीकेचा दावा
चेन्नई: अभिनेता विजय याच्या टीव्हीके या पक्षाने एग्झिट पोलचे अंदाज धुडकावून लावत पक्षाला २००हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला आहे. विजय यांना २०० जागांवर विजय मिळवून द्यायचा, हे जनतेने आधीच ठरवले आहे. त्यामुळे आम्हाला या एग्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असे टीव्हीकेचे नेते के. सेंगोत्तयान म्हणाले; तर अण्णाद्रमुकने कायमच एग्झिट पोलना खोटे ठरवले असल्याचा दावा पलानीस्वामी यांनी केला.
यूडीएफकडून स्वागत
तिरुअनंतपुरम : केरळमधील अंदाजांचे यूडीएफने स्वागत केले आहे. एलडीएफने पोलचे अंदाज फेटाळले आहे. भाजपनेही हे अंदाज खरे नसल्याचे म्हटले आहे. यूडीएफच्या बाजूने जनमत जाईल, असे वाटत नसल्याचे भाजपने म्हटले आहे.





