इस्तंबूलमध्ये मंगळवारी इस्रायली वाणिज्य दूतावास असलेल्या इमारतीजवळ पोलिसांवर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी तत्काळ दिलेल्या प्रत्युत्तरात एका हल्लेखोराचा मृत्यू झाला. उर्वरित दोन हल्लेखोर जखमी अवस्थेत जिवंत पकडले गेले, अशी माहिती तुर्की अधिकाऱ्यांनी दिली.
या गोळीबारात दोन पोलिस अधिकारी किरकोळ जखमी झाले. हल्लेखोरांकडे लांब पल्ल्याची शस्त्रे होती, अशी माहिती इस्तंबूलचे राज्यपाल दावुत गुल यांनी दिली. ‘हल्लेखोर इझमित शहरातून भाड्याच्या कारने इस्तंबूलला आले होते. त्यापैकी एकाचा संबंध ‘एक्सप्लॉयटिंग रिलीजन’ गटाशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे, मात्र या गटाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) यापूर्वी तुर्कीमध्ये अशा प्रकारचे हल्ले केले आहेत,’ असे गृहमंत्री मुस्तफा चिफ्टी यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
जखमी झालेले दोन्ही हल्लेखोर भाऊ असून त्यांची नावे ओनुर सी. आणि एनस सी. अशी आहेत. ओनुर याचा आधी अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये रेकॉर्ड आहे. दोघांची चौकशी सुरू आहे.
हल्ल्याच्या वेळी घेतलेल्या व्हिडिओ फूटेजमध्ये एक हल्लेखोर असॉल्ट रायफल घेऊन, पाठीवर बॅग घालून बसच्या मागे लपून पोलिसांवर गोळीबार करताना दिसतो. चकमकीत एक पोलिस अधिकारी गोळी लागल्याने खाली पडताना दिसतो आणि नंतर झाडामागे आश्रय घेतो. एका पोलिसाच्या पायाला आणि दुसऱ्याच्या कानाला जखम झाली आहे.







