लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन

महाराष्ट्र टाइम्स

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन सुरू होत आहे. या अध्यासनातून डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. महाराष्ट्र शासन, बार्टी आणि लंडन स्कूल इकॉनॉमिक्स मिळून पहिल्या दहा शिष्यवृत्तींसाठी ५०:५० टक्के निधी देणार आहेत. यातून बाबासाहेबांचे विचार जगभर पोहोचतील आणि सामाजिक न्यायावर संशोधन होईल.

लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पहिल्या दहा शिष्यवृत्तींसाठी महाराष्ट्र शासन, बार्टी आणि लंडन स्कूल इकॉनॉमिक्स यांच्यादरम्यान ५०:५० प्रमाणात अर्थसाह्य करण्यात येणार आहे. २०२७-२८ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख ९१ हजार ३१७ पौंड म्हणजेच दोन कोटी ३६ लाख ८३ हजार ९१६ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी निम्मा म्हणजेच १ कोटी १८ लाख ४१ हजार ९५८ रुपयांचा निधी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सकडून देण्यात येणार आहे.

‘ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ या विश्वविख्यात संस्थेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन स्थापन करण्यात येणार आहे. अध्यासनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक न्याय , संविधानिक लोकशाही, आर्थिक समता आणि मानवी हक्कांच्या अभ्यासासाठी जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र निर्माण व्हावे, हा अध्यासन स्थापन करण्यामागील उद्देश आहे. अध्यासनात संविधान आणि लोकशाही, सामाजिक समता, आर्थिक लोकशाही आणि पुनर्वितरण धोरणे, श्रमिक हक्क आणि सामाजिक संरक्षण, संघराज्यवाद आणि सार्वजनिक वित्त, समावेशक शासन व्यवस्था आदी विषयांवरील आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

राज्यघटना अध्ययन, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक धोरण या विषयांत प्रगत संशोधन करणे, वार्षिक व्याख्यानमाला, परिसंवाद आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे, लोकशाही आणि समावेशक विकासविषयक शैक्षणिक प्रकाशने आणि संशोधनाला चालना देणे, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था संशोधकांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवणे ही अध्यासनाची उद्दिष्ट्ये असतील. बाबासाहेबांचा बौद्धिक वारसा असलेल्या विधि, शासन, आंतरराष्ट्रीय विकास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र आणि पब्लिक पॉलिसी या विषयांतील विद्वान प्राध्यापक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कार्यरत आहेत. पहिल्या दहा वर्षांत या अध्यासनासाठी या संस्थेतील विद्यमान प्राध्यापकांतून निवड केली जाईल. त्यानंतर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या निवड प्रक्रियेद्वारे भरती केली जाईल.