पुणे : माजी व्हॉलिबॉलपटू माधुरी भागवत (वय ७३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी तीन वेळा राज्य व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले, तर एका स्पर्धेत त्यांनी संघाचे नेतृत्वही केले. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते भाल भागवत यांच्या त्या कनिष्ठ भगिनी होत.
‘वाकड’ उपांत्य फेरीत
पुणे : वाकड जिमखाना संघाने १२ वर्षांखालील गटाच्या विराट करंडक आतंरक्लब क्रिकेट नहाटा क्रिकेट अकादमीवर एका विकेटनी मात केली आणि उपांत्य फेरी गाठली. संक्षिप्त धावफलक : नहाटा अकादमी - २३ षटकांत सर्व बाद १०९ (सार्थक जगदाळे १९, भार्गव दिवेकर १२, शाश्वतसिंह ३-१९, निधी निलवर ३-१३, श्रेयांश शर्मा २-१६) पराभूत वि. वाकड जिमखाना - २३.५ षटकांत ९ बाद १११ (श्रेयांश शर्मा ३४, मयंक पाल १८, अनुज जी. ३-६, भार्गव ३-१६).
वैष्णवीची आगेकूच
पुणे : वैष्णवी आडकरने महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या एकेरीत विजयी सलामी दिली. नॉटिंगहॅम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित वैष्णवीने ब्रिटनच्या तेगन बुशला ६-३, २-६, ६-३ असे पराभूत केले. वैष्णवीची आता ब्रिटनच्या अमेली ब्रूक्सशी लत होईल.
सिद्धान्तचा विजय
पुणे : पुण्याच्या सिद्धान्त बांठियाने बल्गेरियाच्या अलेक्झांडर डॉन्स्कीच्या साथीत एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत विजयी सलामी दिली. सिद्धान्त-अलेक्झांडर या अव्वल मानांकितांनी यान ह्राझदिल-यान एरमार या चेक प्रजासत्ताकच्या जोडीवर ६-२, ७-५ अशी मात केली. ओस्त्रावा (चेक प्रजासत्ताक) येथे ही स्पर्धा सुरू आहे.






