धर्मप्रचारप्रकरणीतीन अमेरिकींवर गुन्हा

महाराष्ट्र टाइम्स

पुणे पोलिसांनी तीन अमेरिकन नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. हे तिघे पर्यटक व्हिसावर भारतात आले होते. शुक्रवार पेठ परिसरात त्यांनी धार्मिक प्रचार करणारी माहितीपत्रके वाटली. एका विशिष्ट धर्माचा प्रचार करून इतरांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. त्यांना १० मेपर्यंत देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

three american citizens charged for religious promotion in pune

‘पर्यटक व्हिसा’वर भारतात येऊन धार्मिक प्रचार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन अमेरिकन नागरिकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे; तसेच, संबंधितांना १० मेपर्यंत देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार पेठ परिसरात करण्यात आली.

जेम्स हडसन (६५), फ्रान्त्झ थॉमस (५३) आणि गॅरी जीन (६४) अशी कारवाई करण्यात आलेल्या अमेरिकन नागरिकांची नावे आहेत. याबाबत २६ वर्षीय चालकाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे अमेरिकन नागरिक टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते आणि पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. ते २६ एप्रिलला शुक्रवार पेठ परिसरात आले. तेथे त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापलेले पॅम्प्लेट नागरिकांना वाटण्यास सुरुवात केली.

या पॅम्प्लेटवर ‘जग इतके विभागलेले का आहे?’ असा मजकूर लिहिला होता; तसेच एका विशिष्ट धर्माचा देवच सर्वोच्च असल्याचे सांगून इतरांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली. ‘टुरिस्ट व्हिसा’च्या अटींचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला.