प. बंगाल, केरळमध्येसत्तांतर होणार?

महाराष्ट्र टाइम्स

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या जनमत चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. आसाममध्ये भाजप सत्तेची हॅटट्रिक करेल. तमिळनाडूमध्ये द्रमुक पुन्हा सत्तेत येईल. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूडीएफ'ला संधी मिळेल. चार मे रोजी अंतिम निकाल जाहीर होतील.

possibility of government change in west bengal kerala and assam

पश्चिम बंगालमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण होताच जनमत चाचण्यांचे (एग्झिट पोल) निकाल जाहीर झाले. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला सरकार स्थापन करण्याइतपत जागा मिळण्याचा अंदाज बहुतांश चाचण्यांमधून व्यक्त करण्यात आला आहे. आसामात भाजप सत्तेची हॅटट्रिक करणार असून, तमिळनाडूत पुन्हा द्रमुक सत्तेत येईल; तर केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूडीएफ’ला सत्तेची संधी मिळेल, अशा शक्यता अनेक संस्थांनी वर्तविल्या आहेत. पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल चार मे रोजी जाहीर होणार आहे.

मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणीत (एसआयआर) गाळलेली लाखो मतदारांची नावे, भाजपचा आक्रमक प्रचार व ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने दिलेली जोरदार लढत यामुळे यंदा चुरशीच्या बनलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला प्रथमच सत्ता मिळण्याची संधी असल्याचा अंदाज अनेक संस्थांनी जाहीर केला आहे. त्याबरोबरच आसाम व पुद्दुचेरीतही भाजप व भाजप आघाडीला (एनडीए) सत्ता मिळण्याचा अंदाज आहे.

आसाम : आसामात मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचा करिष्मा कायम आहे. जवळपास सर्वच संस्थांनी भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत देत या ठिकाणी ८२ ते १०१ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी २३ ते ३५ जागांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

तमिळनाडू : तमिळनाडूत यंदा त्रिशंकू विधानसभा येऊ शकते, असा अंदाजही व्यक्त होत आहे. द्रमुकला सत्ता स्थापनेची संधी असली तरी अभिनेता विजय याच्या टीव्हीके या पक्षामुळे द्रमुकची दमछाक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २३४ जागांपैकी टीव्हीकेला ६० ते ८० आणि काही संस्थांनी तर १००पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. काहींच्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक आघाडीला १२० ते १६० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

केरळ : केरळमध्ये सत्ताबदलाची परंपरा सुरू होणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त विकास आघाडी म्हणजे ‘यूडीएफ’ला ७० ते ९० जागा मिळतील, अशी शक्यता अनेक संस्थांनी वर्तविली आहे.

पुद्दुचेरीमध्ये मात्र चित्र तुलनेने स्पष्ट दिसत असून जवळपास सर्वच संस्थांनी ‘एनडीए’ला पसंती दिली आहे.