‘डेक्कन’ला दुहेरी मुकुटाची संधी

महाराष्ट्र टाइम्स

पुणे जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना 'अ' संघाला दुहेरी मुकुटाची संधी आहे. मुलांच्या उपांत्य फेरीत डेक्कन 'अ' संघाने मिलेनियम संघावर विजय मिळवला. मुलींच्या उपांत्य फेरीतही डेक्कन 'अ' संघाने चोंधे पाटील संघावर मात केली. डेक्कन 'अ' संघाची आता जेतेपदासाठी नहाटा आणि एमएएसए संघांशी लढत होईल. स्पर्धेत अनेक संघांनी उत्कृष्ट खेळ दाखवला.

‘डेक्कन’ला दुहेरी मुकुटाची संधी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

डेक्कन जिमखाना ‘अ’ संघाला पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित सोळा वर्षांखालील गटाच्या जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुटाची संधी आहे.

डेक्कन जिमखाना क्लबच्या बास्केटबॉल कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. मुलांच्या उपांत्य फेरीत डेक्कन ‘अ’ संघाने मिलेनियम संघावर ६०-३४ असा विजय नोंदवला आणि अंतिम फेरी गाठली. मध्यंतरालाच डेक्कन संघाने ४०-१६ अशी भक्कम आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर मिलेनियम संघाने प्रतिकार केला. मात्र, अखेरीस डेक्कन संघाने पूर्वार्धात मिळवलेली आघाडी महत्त्वाची ठरली. ‘डेक्कन’च्या विजयात आर्यन प्रजापती (१५ गुण), विवान अग्रवाल (११) यांनी मोलाचा वाटा उचलला. मिलेनियम संघाकडून अमेयर दारवटकर (११), समर भुजबळ (१०) यांनी दिलेली लढत अपुरी पडली.

‘डेक्कन’ची आता जेतेपदासाठी नहाटा संघाशी लढत होईल. आराध्य भावसार (२३), शर्विल हुबळीकर (१६) यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर नहाटा संघाने ‘आरएसबी’ संघावर ५३-३८ अशी मात केली. मध्यंतराला नहाटा संघाकडे १८-१४ अशी आघाडी होती. ‘आरएसबी’कडून अंकित एम. (१५) आणि युवित जैन (८) यांनी दिलेली लढत अपुरी पडली.

मुलींच्या उपांत्य फेरीत डेक्कन ‘अ’ संघाने चोंधे पाटील संघावर ५१-२३ असा एकतर्फी विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. विजयात अनुषा सोनटक्के (१७), तानिरिका चक्रवर्ती (१३) यांनी मोलाचा वाटा उचलला, तर पराभूत संघाकडून इरा जाधव (७), स्वातीकुमार (६) यांनी दिलेली लढत अपुरी पडली.

डेक्कन ‘अ’ संघाची आता जेतेपदासाठी मिलेनियम आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटी (एमएएसए) संघाशी लढत होईल. ‘एमएएसए’ने एमएमबीसी ‘अ’ संघावर ५२-३७ अशी मात केली. मध्यंतराला ‘एमएएसए’कडे ३०-२७ अशी आघाडी होती. मात्र, मध्यंतरानंतर ‘एमएएसए’च्या खेळाडूंनी जोरदार खेळ केला आणि विजय साकारला. विजयात अरियाना शिंदे (१३ गुण), रुद्राणी हलिघोंगडे (१२) यांनी मोलाचा वाटा उचलला, तर ‘एमएमबीसी’ आर्वी धोका (१६), अनुष्का शुक्ला (१३) यांनी दिलेली लढत अपुरी पडली.