पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘सनसनाटी आणि अंदाजाधारित मजकूर प्रदर्शित करणाऱ्यांच्या प्रदर्शनाला आळा घालण्याच्या उद्देशाने सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांसाठी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स ( टीआरपी ) जाहीर न करण्याच्या आदेशाला चार आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
टेलिव्हिजन रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलला (बीएआरसी) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सहा मार्च रोजी टीव्ही वृत्तवाहिन्यांसाठी टीआरपी जाहीर न करण्याचा पहिल्यांदा आदेश जारी केला होता. हा आदेश चार आठवड्यांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी येईल, तोपर्यंत लागू राहील. ‘पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही वृत्तवाहिन्यांकडून होणाऱ्या अनावश्यक सनसनाटी आणि अंदाजाधारित जो मजकूर प्रदर्शित केला जातो त्याला आळा घालण्याच्या उद्देशाने हा आदेश देण्यात आला. यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये विशेषत: ज्यांचे मित्र आणि कुटुंबीय बाधित भागात आहेत किंवा त्या भागात राहतात त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते; तसेच सध्या संघर्षाची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर कायम आहे,’ असेही मंत्रालयने प्रसिद्ध केलेल्या नव्या आदेशात म्हटले आहे.

