‘पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतीय विमान कंपन्यांची दहा हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत’, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव असंगबा चुबा आव यांनी मंगळवारी सांगितले. ‘विमान इंधनाच्या (एटीएफ) आंतरराष्ट्रीय किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र भारतात एटीएफच्या किमतींमध्ये सरकारच्या हस्तक्षेपामुळे किंमती नियंत्रणात ठेवल्यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांवर याचा अंशतः परिणाम झाला आहे. एटीएफच्या किमतींमधील सरकारी हस्तक्षेपामुळे देशांतर्गत विमान भाडे स्थिर ठेवण्यास मदत झाली आहे’, असेही आव यांनी स्पष्ट केले .
‘ भारतीय विमान कंपन्या पूर्वी पश्चिम आशियासाठी दररोज ३००-३५० उड्डाणे चालवत असत, जी संख्या आता केवळ ८०-९०वर आली आहे. या संघर्षामुळे इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, कुवेत, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांमधील हवाई क्षेत्र बंद किंवा प्रतिबंधित झाले आहे, ज्यामुळे जागतिक हवाई वाहतूक नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटीमध्ये अभूतपूर्व व्यत्यय आला आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या विमानांना आता प्रचंड लांबच्या मार्गांनी वळसा घालून जावे लागत असल्याने प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत’, असे ते म्हणाले.
‘या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अलीकडेच लांब पल्ल्याची उड्डाणे करणाऱ्या वैमानिकांच्या उड्डाण कर्तव्याचे तास तात्पुरते शिथिल केले आहेत. यामुळे उड्डाण आणि कामाचे तास (उदा. उड्डाणाचा वेळ अंदाजे ११.५ तासांपर्यंत) वाढवण्यात आले आहेत, ज्यामुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि भू-राजकीय तणावामुळे लांबच्या मार्गांनी जाव्या लागणाऱ्या विमानांचे संचालन करणे विमान कंपन्यांना अधिक चांगल्या प्रकारे शक्य होईल’, असे त्यांनी सांगितले.
मुंबई : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर ८ एप्रिलपासून इंधन अधिभार आकारला जाणार आहे, असे एअर इंडिया समूहाने मंगळवारी जाहीर केले. देशांतर्गत उड्डाणांवर हा अधिभार २९९ ते ८९९ रुपये असेल, तर आंतरराष्ट्रीय मार्गांवर २४ डॉलर (सुमारे २,२०० रुपये) ते २८० डॉलर (सुमारे २५ हजार रुपये) अधिभार आकारला जाईल. काही मार्गांसाठी अधिभार नंतर जाहीर केला जाणार आहे. हा अधिभार एअर इंडिया एक्स्प्रेस उड्डाणांनाही लागू असेल. बांगलादेश, जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया मार्गांवरील अधिभारासाठी नियामक मान्यतेनंतर निर्णय घेतला जाईल. यामुळे आता एअर इंडियाची तिकिटे महागणार आहेत. कच्च्या तेलाच्या किमती आणि शुद्धीकरण तफावत वाढल्यामुळे विमान कंपन्यांसाठी ही अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.





