विमान वाहतुकीवर युद्धाचे पडसाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतीय विमान कंपन्यांची दहा हजारांहून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. विमान इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम जाणवत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांचे कार्य स्मरणीय असल्याचे पुत्र निशांतकुमार यांनी म्हटले आहे. दिल्लीत एका इमारतीला आग लागून तेरा जणांना वाचवण्यात आले. ओडिशात आदिवासी समुदायाच्या विरोधानंतर झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाले. नेपाळ सरकारने सहा देशांतील राजदूतांना माघारी बोलावले.

विमान वाहतुकीवर युद्धाचे पडसाद

नवी दिल्ली : ‘पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतीय विमान कंपन्यांची दहा हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत’, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव असंगबा चुबा आव यांनी सांगितले. ‘विमान इंधनाच्या (एटीएफ) आंतरराष्ट्रीय किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र भारतात एटीएफच्या किमती सरकारने नियंत्रणात ठेवल्याने देशांतर्गत विमान कंपन्यांवर याचा अंशतः परिणाम झाल्याचे आव यांनी स्पष्ट केले.

वडिलांचे कार्य स्मरणीय

पाटणा : ‘बिहारचे मुख्यमंत्री व माझे वडील नितीशकुमार यांचे कार्य राज्यातील जनता विसरू शकत नाही, त्यांचे कार्य स्मरणीय आहे’, असे मत नितीशकुमारांचे पुत्र निशांतकुमार यांनी मांडले. नितीशकुमारांसह संयुक्त जनता दलास (जेडीयू) असलेल्या जनतेच्या पाठिंब्यात कोणतीही कमी येणार नाही, असा दावाही त्यांनी केला. सोनपूर येथील बाबा हरिहर नाथ मंदिरला निशांत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. नितीशकुमार यांची राज्यसभेवर निवड झाली असून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

तेरा जणांना वाचविले

नवी दिल्ली : दिल्लीतील पूर्व भागातील पटेल नगर येथे रहिवाशी इमारतीला आग लागली. या दुर्घटनेतून तेरा जणांना वाचविण्यात यश आले. यामध्ये तीन बालकांसह सात महिला आणि तीन पुरुष यांचा समावेश आहे. हॉटेललगत असलेल्या या इमारतीला दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन वाहनांना बोलवावी लागली.

अठ्ठावन्न पोलिस जखमी

भुवनेश्वर : ओडिशात स्थानिक आदिवासी समुदायाकडून झालेल्या विरोधानंतर उडालेल्या संघर्षात सत्तरपेक्षा अधिक जण जखमी झाले. यात ५८ पोलिसांचा समावेश आहे. रायगडा जिल्ह्यातील सिजिमाली येथील बक्सर खाणीलगत ही घटना घडली. या भागातून जाणाऱ्या महामार्ग प्रकल्पाला स्थानिक आदिवासींचा विरोध आहे. जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात महिला देखील जखमी झाल्या.

राजदूत माघारी

काठमांडू : नेपाळमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारने सहा देशांमधील राजदूतांना माघारी बोलावण्याचे आदेश मंगळवारी दिले. यात भारतातील राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांचाही समावेश आहे. यापूर्वीच्या के. पी. शर्मा ओली सरकारने या राजदूतांची नेमणूक केली होती. श्रीलंका, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि भारत या देशातील राजदूतांचा यात समावेश आहे.

नागालँडमध्ये हिंसा

कोहिमा : नागालँडमधील कोरिडांग (एसटी) विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार मंगळवारी संपुष्टात आला. गेल्या ४८ तासांत हिंसाचाराच्या घटना घडल्याच्या वृत्तांमुळे निवडणुकीचे वातावरण तणावपूर्ण बनले होते. तेथे हिंसाचारात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच, अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेतले आहे. नॅशनल पीपल्स पार्टी,‘पीडीए’ आणि काँग्रेस अशा तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत.

‘एआय’ वापरास मनाई

चंडीगड : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने न्यायिक अधिकाऱ्यांना निकाल लेखन आणि कायदेशीर संशोधनासाठी चॅट जीपीटी, जेमिनी, कोपायलट अशा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांना वापरास मनाईचे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे निबंधक महाव्यवस्थापक यांनी पंजाब, हरियाणा व चंडीगडमधील सर्व न्यायाधीशांना उद्देशून एक पत्र जारी केले आहे.