‘अनेक पालक मला भेटतात आणि माझ्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचे आहे म्हणून सांगतात. मात्र, मुलाने आयपीएल मध्ये खेळावे अशी इच्छा ते व्यक्त करतात. त्या वेळी मला वाईट वाटते,’ अशी खंत भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केली. मुलांनी देशाकडून खेळण्याचे स्वप्न बाळगावे. आयपीएल हा केवळ एक टप्पा आहे. अंतिम ध्येय भारताची जर्सी परिधान करण्याचे असावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
पूना क्लबने त्यांचे मैदान पुनर्विकसित करताना त्याला जागतिक दर्जाचे वाळू-आधारित क्रिकेट स्टेडियम बनविले आहे. त्याचे उद्घाटन वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिलदेव यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यात माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, शुभांगी कुलकर्णी, मिलिंद गुंजाळ, श्रीकांत कल्याणी, अध्यक्ष गौरव गढोके आदी उपस्थित होते. कपिलदेव म्हणाले, ‘आयपीएल वाईट आहे, असे माझे मुळीच म्हणणे नाही. आमच्या काळात आयपीएल असते, तर आम्हीदेखील खेळलोच असतो. मात्र, अंतिम ध्येय भारताकडून खेळण्याचे असावे.’ चंदू बोर्डे यांनी १९८३च्या वर्ल्ड कपसाठी सर्वोत्तम संघ दिल्याच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला आणि त्याबाबत बोर्डे यांचे आभारही मानले. ‘वयाच्या १६व्या वर्षी मी या मैदानात खेळलो होतो. मात्र, या मैदानाचे पूर्णपणे कायापालट झाला आहे. त्यामुळे या नव्या स्टेडियमचा वापर करून देशाला चांगले क्रिकेटपटू मिळतील, अशी आशा करूयात,’ असे चंदू बोर्डे म्हणाले. पूना क्लबचे अध्यक्ष गौरव म्हणाले, ‘मैदानाची ड्रेनेज सिस्टिम उत्तम असून, वेगाने पाण्याचा निचरा होण्याची मैदानाची क्षमता आहे. पुनर्विकसित सुविधेत आधुनिक वाळू-आधारित आउटफिल्ड आहे. कुठल्याही मोसमात या मैदानाचा उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी माजी भारतीय क्रिकेट पटू अबे कुरुविला आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) क्युरेटर प्रकाश आढाव यांनी मार्गदर्शन केले, तर हृषीकेश कानिटकर आणि ऋतुराज गायकवाड यांनीही मोलाच्या सूचना दिल्या.’






