नवी दिल्ली : खेरा यांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेल्या छाप्यांवरून काँग्रेसने मंगळवारी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणाऱ्या दांडगट व्यक्तीकडून ही जुलूमशाही सुरू असल्याचे काँग्रेसने म्हटले. ‘जनहिताचे मूलभूत प्रश्न विचारल्याबद्दल खेरा यांना अटक करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची संपूर्ण फौज तैनात करणे हे आसामचे मुख्यमंत्री अस्वस्थ, हतबल आणि विचलित झाल्याचे सिद्ध करते’, अशी टीका काँग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर केली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात केलेल्या आरोपांशी संबंधित प्रकरणात आसाम पोलिसांनी मंगळवारी काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला. खेरा तिथे उपस्थित नव्हते, मात्र त्यांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पवन खेरा यांच्या निवासस्थानाबाहेर आसामचे पोलिस उपायुक्त देबोजित नाथ यांनी माध्यमांना माहिती दिली. ‘खेरा त्यांच्या निवासस्थानी आढळले नाहीत. मात्र, घराची झडती घेण्यात आली आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. काही आक्षेपार्ह साहित्यही सापडले असून, तूर्त त्याचा तपशील उघड करता येणार नाही’, असे ते म्हणाले. खेरा यांच्या विधानांबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर गुवाहाटीतील गुन्हे शाखा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेरा यांचा सध्या ठावठिकाणा माहीत नाही, परंतु त्यांचा शोध घेतला जाईल, असे उपायुक्तांनी सांगितले.
आसाम पोलिसांच्या पथकाने दिल्लीत आल्यावर दिल्ली पोलिसांना औपचारिकपणे कळवले, त्यानंतर स्थानिक पोलिस पथकही कार्यवाहीत सहभागी झाले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सरमा यांच्या पत्नीकडे तीन पासपोर्ट असल्याचा आणि त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप खेरा यांनी रविवारी केल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडली आहे. काँग्रेसने पाकिस्तानी सोशल मीडिया गटाकडून मिळवलेल्या खोट्या माहितीचा वापर करून त्यांच्या पत्नीविरोधात निराधार आणि दुर्भावनापूर्ण आरोप केले. हा आसाम निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असून, दंडनीय गुन्हा आहे, अशी प्रतिक्रिया सरमा यांनी दिली.
हैदराबादला पळाल्याचा
सरमा यांचा दावा
शिवसागर : पवन खेरा यांनी आसाम पोलिसांना अटक करण्याचे आव्हान दिल्यानंतर हैदराबादला पळ काढला, असा दावा हिमंता सरमा यांनी केला.
‘ते का गेले हे मला माहीत नाही, कारण ते (खेरा) काल स्वतःच पळून गेले. कालपर्यंत ते म्हणत होते की, मला अटक करा आणि आता पोलिस त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा ते पळून गेले’, अशी टीका सरमा यांनी केली.







